केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मणिपूरमधील परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच मणिपूरमध्ये मदत आणि पुनर्वसनासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. ‘आसाम ट्रिब्यून’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
मणिपूरच्या विषयावर मी यापूर्वी संसदेत बोललो आहे. तेथील संघर्ष रोखण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मणिपूरमधील संघर्ष रोखण्यासाठी कार्यरत होती. केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारने केलेल्या विविध प्रयत्नांमुळेच आज मणिपूरमधील परिस्थितीत सुधारणा झाली आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच मणिपूरमधील संघर्ष शिगेला पोहोचला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरमध्ये तळ ठोकून होते. त्यावेळी त्यांनी १५ पेक्षा जास्त बैठका घेतल्या, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा –
पुढे बोलताना त्यांनी मणिपूरमध्ये मदत आणि पुनर्वसनासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचेही माहिती दिली. मणिपूरमध्ये मदत आणि पुनर्वसनाचे काम सुरू आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून मणिपूर सरकारला आवश्यक ती सर्व मदत देण्यात आहे. तसेच शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदतदेखील करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
गेल्या वर्षी झाली होती हिंसाचारला सुरुवात
दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात २०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी होत असल्याच्या निषेधार्थ मणिपूरच्या पहाडी जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर या हिंसाचाराला सुरुवात झाली होती.