PM Narendra Modi on Muslims & Waqf Act : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१४ एप्रिल) काँग्रेसवर तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी वक्फ कायदा बदलण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “वक्फ बोर्डाने त्यांच्या मूळ उद्देशाप्रमाणे कम केलं असतं तर आज भारतातील मुसलमान गरीब राहिले नसते, त्यांना गरिबीत दिवस काढावे लागले नसते, पंक्चर दुरुस्त करण्यासारखी कमी दर्जाची कामं करत बसावं लागलं नसतं.” पंतप्रधानांनी काँग्रेसवर संविधान व सामाजिक न्यायाची किंमत मोजून आपली मतपेढी मजबूत करण्यासाठी वक्फच्या नियमांमध्ये बदल केल्याचा आरोप केला.

हरियाणातील हिसार येथे आयोजित एका जनसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी संविधानाचा शस्त्र म्हणून वापर केला. सत्ता कायम ठेवण्यासाठी आणीबाणी लावली. आणीबाणीच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी संविधानाच्या मूळ भावनेची हत्या केली.

नरेंद्र मोदींची काँग्रेसवर सडकून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आपल्या संविधानात धर्मनिरपेक्ष नागरी कायद्यांबाबत उहापोह करण्यात आला आहे. परंतु, काँग्रेसने ते कधीही लागू केले नाहीत. काँग्रेसने केवळ मुस्लीम कट्टरपंथीयांचं तुष्टीकरण केलं. आपण (एनडीए) आणलेल्या नवीन कायद्याला त्यांचा विरोध हेच सिद्ध करतो. मात्र, आम्ही आणलेल्या वक्फ कायद्याचा उद्देश केवळ गरीब व वंचित मुसलमानांचा विकास करणे हा आहे. मुस्लीम महिलांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.”

…तर मुस्लीम तरुणांना पंक्चर दुरुस्त करण्यात आयुष्य घालवावं लागलं नसतं : नरेंद्र मोदी

मुसलमानांप्रती काँग्रेसच्या उद्देशांवर शंका उपस्थित करत मोदी म्हणाले, ते (काँग्रेस) म्हणतात की त्यांनी मुसलमानांसाठी अमुक केलं, तमुक केलं. मला त्या मतांसाठी भूकेल्या राज्यकर्त्यांना विचारायचं आहे की त्यांना खरंच मुसलमानांबाबत आपुलकी आहे का? त्यांना खरंच आपुलकी असेल तर काँग्रेस त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदी मुस्लीम व्यक्तीची नेमणूक का करत नाही? तसेच काँग्रेस निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांची ५० टक्के तिकिटं मुस्लीम उमेदवारांसाठी राखीव का ठेवत नाही? ते कधीच असं करत नाहीत. कारण त्यांची तशी इच्छा देखील नाही. उलट ते देशातील नागरिकांचे ५० टक्के अधिकार हिरावू पाहत आहेत. काँग्रेसने खरंच मुसलमानांसाठी काही केलं असतं तर माझ्या मुस्लीम तरुणांना आज पंक्चर दुरुस्त करण्यात आयुष्य घालवावं लागलं नसतं.