भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशमध्ये कार्यकर्ता महाकूंभ कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले, मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा हे बिमारू (आजारी) राज्य होतं. घाणेरडं राजकारण, कुशासन आणि कोट्यवधींचा भ्रष्टाचार ही काँग्रेस सरकारची ओळख होती. परंतु, आता मध्य प्रदेशने झेप घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस पोकळ झाली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यानंतर मध्य प्रदेशात दीर्घ काळ काँग्रेसचीच सत्ता होती. परंतु या काळात काँग्रेसने नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध अशा मध्य प्रदेश राज्याला आजारी राज्य बनवलं. काँग्रेसच्या काळात मध्य प्रदेशात घोटाळ्यांचे विक्रम झाले, घोटाळ्यांचे इतिहास रचले गेले. व्होट बँक, तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्या या पक्षाला पुन्हा मध्य प्रदेशात संधी मिळाली तर राज्याचं आणखी नुकसान होईल. काँग्रेस पुन्हा एकदा मध्य प्रदेश राज्याला आजारी राज्य बनवेल.
नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने त्यांची इच्छाशक्ती गमावली आहे. गेल्या काही काळापासून काँग्रेसचे तळागाळातले नेते शांत बसले आहेत. काँग्रेसचे तळागाळात पोहोचलेले नेते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. काँग्रेस आधी उद्ध्वस्त झाली, त्यानंतर कंगाल झाली आहे. आता काँग्रेसने त्यांचा ठेका दुसऱ्यांना दिला आहे. काँग्रेस हा पक्ष आता काँग्रेसचे नेते चालवत नाहीत. काँग्रेस ही एक अशी कंपनी झाली आहे, ज्यांच्या घोषणांपासून धोरणांपर्यंत सगळ्याच गोष्टी आयात केल्या जात आहेत.
पंतप्रधान म्हणाले, काँग्रेस त्यांच्या घोषणा आणि धोरणं कोणाकडून आयात करते? काँग्रेसचा ठेका कोणाकडे आहे माहितीय का? काँग्रेसचा ठेका आता काही अर्बन नक्षलवाद्यांकडे आहे. काँग्रेसमध्ये आता अर्बन नक्षलवाद्यांचं चालतं. काँग्रेसच्या तळागाळातील नेत्यांना आता जाणवू लागलं आहे की त्यांचा पक्ष जमिनीवर पोकळ झाला आहे.