पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांच्या हस्ते नोएडातील सुमारे ३५ एकर क्षेत्रात जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंगच्या मोबाइल फॅक्टरीचे उद्घाटन होणार आहे. ही फॅक्टरी जगातील सर्वांत मोठी मोबाइल फॅक्टरी असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधानांच्या महत्वकांक्षी मेक इन इंडिया अंतर्गत हा प्रकल्प होणार असल्याचे बोलले जाते.

मोदी आणि मून जे इन हे एकाच हेलिकॉप्टरमध्ये नोएडात येणार आहेत. त्यांच्यासाठी फॅक्टरीमध्येच विशेष हेलिपॅड उभारण्यात आले आहे. आज या फॅक्टरीचे उद्घाटन होणार आहे. रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला होता. सुरक्षेचा आढावा घेत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चाही केली.

नोएडा येथील मोबाइल फॅक्टरी ही जगातील सर्वांत मोठी फॅक्टरी आहे. सॅमसंगने हा प्लांट चीन, दक्षिण कोरिया किंवा अमेरिकेत सुरू न करता थेट नोएडात सुरू केला आहे. सॅमसंगने ९०च्या दशकांत भारतात पर्दापण केले होते. १९९७ मध्ये त्यांनी टीव्हीचे भारतात उत्पादन सुरू केले होते.

गतवर्षी जून महिन्यात दक्षिण कोरियाच्या या कंपनीने नोएडात ४९१५ कोटी गुंतवणार असल्याचे जाहीर केले होते. कंपनी सध्या भारतात ६७ मिलियन स्मार्टफोन तयार करते. हा नवीन प्लांट सुरू झाल्यानंतर हीच संख्या १२० मिलियनपर्यंत पोहोचेल. कंपनी फक्त मोबाइलचे उत्पादनच वाढवणार नाही तर रेफ्रिजरेटर, फ्लॅट टेलिव्हिजन आदींची उत्पादनेही वाढवण्यात येणार आहेत.

सॅमसंगचे दोन युनिट सुरू आहेत. यातील एक नोएडा आणि दुसरा तामिळनाडूतील श्रीपेरूबंदर येथे सुरू होत आहे. यामधून सध्या ७० हजार लोकांना रोजगार मिळाला असून ही संख्या दीड लाखांपर्यंत वाढेल.

Story img Loader