नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ८७ व्या मन की बात कार्यक्रमात देशातून होणाऱ्या वाढत्या निर्यातीचा दाखला देत ही देशातील पुरवठा साखळी मजबूत झाल्याची खूण असल्याची ग्वाही दिली. त्याच वेळी भारतीय वस्तूंना परदेशी बाजारपेठांत आता मागणी वाढल्याचेही हे द्योतक आहे, हे त्यांनी निदर्शनास आणले. या सर्व यशाचे श्रेय त्यांनी देशातील शेतकरी, कुशल कारागीर, विणकर, अभियंते, लघुउद्योजक यांचे कष्ट आणि सूक्ष्म, लघु, मध्यम व्यवसाय क्षेत्र (एमएसएमई) यांना दिले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने ४० हजार कोटी डॉलर (३० लाख कोटी रुपये) निर्यातीचे लक्ष्य गाठले आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी वर्ग, अभियंते आणि छोटे-मध्यम उद्योग-व्यावसायिक यांच्या कष्टातून हे साध्य झाले आहे. एकेकाळी भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा हा १० हजार कोटी डॉलर असायचा. तो कधी १५ हजार कोटी डॉलर तर कधी २० हजार कोटी डॉलरवर गेला होता. पण आज भारताने ४० हजार कोटी डॉलर इतक्या निर्यातीचा पल्ला गाठला आहे. याचाच अर्थ भारतात तयार होणाऱ्या वस्तूंना आता संपूर्ण जगभरातच मागणी होऊ लागली आहे. दुसरे म्हणजे देशातील पुरवठा साखळी ही दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे, हे यातून दिसून येते, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
निर्यातवाढ होत असलेल्या वस्तूंमध्ये त्यांनी आसाममधील हैलाकंदी येथील चामडय़ाच्या वस्तू, उस्मानाबादमधील हातमागाची उत्पादने, बिजापूरची फळे आणि भाज्या, चांदौनीमधील काळा तांदूळ यांचा उल्लेख केला. याशिवाय आणखी काही देशांत विविध वस्तू पाठविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. उदाहरणादाखल, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये उत्पादन घेतलेल्या बाजरीचा पहिला साठा डेन्मार्कला रवाना झाला आहे. आंध्रच्या कृष्णा आणि चित्तूर जिल्ह्यातील बैंगनपल्ली आणि सुबर्णरेखा आंबे दक्षिण कोरियात पाठविण्यात आले आहेत. त्रिपुरातील ताजे फणस हवाईमार्गे लंडनला पाठविले आहेत. या वेळी प्रथमच नागालँडच्या किंग मिरच्या लंडनला पाठविल्या आहेत. गुजरातमधून भालिया जातीचा गहू केन्या आणि श्रीलंकेत पाठविला आहे, असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणले.
आगामी जागतिक आरोग्य दिनाचा ( ७ एप्रिल) संदर्भ देत मोदी यांनी वाराणसी येथील पद्मश्री बाबा शिवानंद यांचा उल्लेक केला. हे साधू १२६ वर्षांचे असून त्यांच्या योगसाधनांतून कमावलेल्या आरोग्याचे मोदी यांनी कौतुक केले. योग आणि आयुर्वेदाचा आता जगभरात प्रसार होत असून आयुष उत्पादनांची मागणी वाढली आहे. हा उद्योग सहा वर्षांपूर्वी २२ हजार कोटींचा होता, तो एक लाख ४० हजार कोटींवर पोहोचला आहे. स्टार्ट अप् उद्योगांसाठी आयुष हे योग्य क्षेत्र ठरत आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
ई-मार्केटची सुविधा
सरकारच्या ई-मार्केट (जीईएम) पोर्टलचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, या पोर्टलवर होणाऱ्या खरेदी व्यवहारात छोटय़ा व्यावसायिकांचाही मोठा वाटा आहे. गेल्या वर्षभरात सरकारने या पोर्टलवरून एक लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या वस्तूंची खरेदी केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील सुमारे सव्वा लाख छोटे व्यावसायिक-दुकानदार यांनी थेट सरकारला आपला माल विकला आहे. एकेकाळी केवळ मोठय़ा कंपन्याच सरकारला आपला माल विकू शकत असत. आता छोटय़ात छोटा दुकानदारही आपला माल या पोर्टलवरून सरकारला विकू शकतो, असे मोदी म्हणाले.
नाशिकच्या स्वच्छतादूताचा उल्लेख
मोदी यांनी स्वच्छतेच्या आघाडीवर योगदान दिलेल्या नागरिकांच्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांनी यासंदर्भात नाशिकच्या स्वच्छतादूत चंद्रकिशोर पाटील यांचा उल्लेख केला. ते गोदावरीच्या काठी स्वच्छता मोहिमा राबवितात. मोदी यांनी पुरीचे राहुल महाराणा यांच्या साफसफाई मोहिमांचेही कौतुक केले.
फुले, आंबेडकर जयंती
सरकार महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आगामी जयंती साजरी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुलींच्या शिक्षणासाठी जोतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी योगदान दिले असून शाळांत मुलींची उपस्थिती वाढावी यासाठी काही दिवसांपूर्वी कन्या शिक्षण प्रवेश उत्सव सुरू करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.