Gaza hospital attack: इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत गेल्या ११ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर शेकडो क्षेपणास्रं डागून या युद्धाला सुरुवात केली. त्यापाठोपाठ इस्रायलनेही गाझा पट्टीवर क्षेपणास्रं डागली. या युद्धात आतापर्यंत चार हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, गाझातील अल-अहली रुग्णालयात भीषण मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात तब्बल ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. या बातमीने संपूर्ण जगाला हादरा बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हमासने युद्ध पुकारल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीतील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर, इस्रायलने गाझा पट्टीतल्या मानवतावादी सुविधा खंडित केल्या आहेत. गाझा पट्टीत, गेल्या काही दिवसांपासून वीज नाही, पाणी नाही. अत्यंत बिक परिस्थितीमुळे तिथले नागरिक जीव मुठीत धरून मिळेल त्या ठिकाणी स्थायिक होत आहेत. अनेक रुग्णालयातील इंधनसाठा संपत आल्याने रुग्णांचा जीवही धोक्यात आला आहे. अशातच, गाझातील अल अहली रुग्णालयात भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामुळे रुग्णालय इमातीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरातील मैदानात मृतदेहांचा खच पडला असून इमारतीच्या खिडक्या-दरवाजेही तुटले आहेत. या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

दरम्यान, या घटनेवर जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये मोदी यांनी म्हटलं आहे, गाझामधील अल अहली रुग्णालयात झालेल्या जीवितहानीबाबतचं वृत्त ऐकून मला धक्का बसला आहे. ही खूप दुःखद घटना आहे. पीडितांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या संवेदना, तसेच या स्फोटात जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. तिथे सध्या सुरू असलेल्या संघर्षात नागरिकांचे बळी जाणे ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. यात सहभागी असणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे.

हे ही वाचा >> VIDEO: गाझातील रुग्णालयात स्फोट होऊन ५०० जणांचा मृत्यू, पॅलेस्टिनकडून इस्रायलवर गंभीर आरोप, म्हणाले…

रुग्णालयात स्फोट कोणी घडवून आणला?

अल अहली रुग्णालयावर हल्ला कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हमासने इस्रायलवर आरोप केला आहे. तर इस्रायली सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या हल्ल्यामागे हमासच असल्याचं इस्रायली लष्कराने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi shocked over gaza hospital attack says those involved should be responsible asc