Rahul Gandhi on Manipur CM Resignation : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यांनी टीका केली आहे. जनतेच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या आणि काँग्रेसच्या वाढत्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचं म्हटलंय. तसंच, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही दोषारोप केले. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट केली होती.

राहुल गांधी म्हणाले, “जवळजवळ दोन वर्षे भाजपाचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी मणिपूरमध्ये फूट पाडली. हिंसाचार, जीवितहानी आणि मणिपूरमध्ये भारताच्या कल्पनेचा नाश होऊनही पंतप्रधान मोदींनी त्यांचं मुख्यमंत्री पद काढून घेतलं नाही. वाढत्या जनतेच्या दबावाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीचा आणि काँग्रेसच्या अविश्वास ठरावामुळे त्यांनी राजीनामा दिला.”

“राज्यात शांतता प्रस्थापित करणे आणि मणिपूरच्या लोकांच्या जखमा भरून काढण्यासाठी काम करण्याला आता प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी ताबडतोब मणिपूरला भेट द्यावी, लोकांचे म्हणणे ऐकावे आणि शेवटी सामान्य स्थिती परत आणण्यासाठी योजना आखावी”, असं आवाहनही त्यांनी केली.

एन. बिरेन सिंह काय म्हणाले होते?

राज्यपालांना सुपूर्द केलेल्या आपल्या राजीनाम्यात एन. बिरेन सिंह म्हणाले आहे की, मी मणिपूरी व्यक्तीच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने वेळेवर केलेल्या हस्तक्षेपाबद्दल आभारी आहे. सरकारने वेगवेगळ्या विकास कामांना गती दिली आणि विविध योजना लागू केल्या. एन. बिरेन सिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण मदत आणि मार्गदर्शनामुळे मणिपूरच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली.

राजीनामा का दिला?

कॉनराड संगम (Conrad Sangma) यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने (NPP) ने पाठिंबा काढून घेतला असला तरीदेखील आमदारांनी नेतृत्व बदलाची मागणी केली होती. जर फ्लोर टेस्ट झाली असती तर असमाधानी आमदार पक्षाचा व्हिप मान्य न करण्याची शक्यता होती, त्यामुळे सरकार संकटात येऊ शकले असते. या पासून बचावासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. एन. बिरेन सिंह यांनी पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाबरोबर चर्चा केल्यानंतरच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एन. बिरेन सिंह हे मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर देखील विरोधकांच्या निशाण्यावर होते. विरोधकांकडून बऱ्याचदा त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.

अमित शाह, जेपी नड्डांच्या भेटीनंतर निर्णय

एन बिरेन सिंह यांनी आज सकाळी दिल्लीत भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्याच्या राजकीय स्थिती आणि संभाव्य पर्यायांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान भाजपाच्या सुत्रांनुसार तब्बल १२ आमदार नेतृत्व बदलाच्या मागणीसाठी दबाव टाकत होते. तर ६ आमदार तटस्थ होते.

Story img Loader