नवी दिल्ली : दिल्लीतील मतदानाच्या पूर्वसंध्येला, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर दिले. दीड तासांच्या या भाषणात मोदींनी अप्रत्यक्षपणे आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवालांवर शरसंधान साधले. ‘शीशमहल, जकुझी, स्टायलिश शॉवर अशा चैनीच्या वस्तूंवर लक्ष असणारे जनतेचा विकास कसा करणार’, असा सवाल मोदींनी केला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही मोदींनी कानपिचक्या दिल्या. ‘झोपडीत जाऊन फोटोसेशन करणाऱ्यांना संसदेतील गरिबांच्या कल्याणाची भाषा बोअरिंगच वाटणार’, असा टोमणा मोदींनी हाणला.
‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मोदींनी एनडीए सरकारच्या जनकल्याणाच्या योजनांचा पाढा वाचला. ‘पूर्वीप्रमाणे केंद्र सरकारच्या घोटाळ्यांचे मथळे वृत्तपत्रात येत नाहीत. १० वर्षांत घोटाळे न झाल्याने कोट्यवधी रुपयांची बचत झाली असून ते एनडीए सरकारने लोकांच्या विकासासाठी वापरले. आमच्या निर्णयामुळे बचत होते, त्याचा वापर आम्ही शीशमहल बनवण्यासाठी नव्हे तर, देश उभारण्यासाठी करतो’, असे मोदी म्हणाले.
काही राजकीय पक्ष फक्त आश्वासने देतात पण, पूर्ण करत नाहीत. हे पक्ष तरुणांच्या भवितवर ‘आपदा’ बनून कोसळत आहेत. आम्ही कसे काम करतो हे हरियाणाने पाहिले आहे. ‘बिनाचिठ्ठी’ नोकरी (पान ८ वर) (पान १ वरून) देत आहोत. आम्ही सांगतो तेच करतो म्हणूनच हरियाणामध्ये आम्ही तिसऱ्यांदा विजयी झालो. महाराष्ट्रातही ऐतिहासिक विजय मिळाला. पहिल्यांदाच भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. लोकांच्या आशीर्वादाने हे घडू शकले, असे म्हणत मोदींनी दिल्लीतील निवडणुकीच्या राजकारणाचे इप्सित साधल्याचे स्पष्ट झाले. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये १२ लाखांच्या उत्पन्नावरील करमुक्तीच्या घोषणेचाही मोदींनी आवर्र्जून उल्लेख केला.
ओबीसी तेव्हा का आठवले नाहीत?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या दलित-आदिवासी-ओबीसींच्या जनगणनेचा आणि विकासाच्या मुद्द्याचाही मोदींनी समाचार घेतला. ’जातींबद्दल बोलणे आता फॅशन झाली आहे. ३० वर्षे ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याची मागणी होत होती. ज्यांना आता जातीवादातून राजकीय मलई दिसते, तेव्हा त्यांना ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देता आला नाही. दलित-आदिवासी-ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वैद्याकीय महाविद्यालयांमध्ये किती जागा वाढवल्या, किती शाळा-महाविद्यालये सुरू केली यांचीही माहिती देत मोदी म्हणाले की, काहींनी केवळ तुष्टीकरणाचे राजकारण केले. पण, आम्ही देशाला विकसीत करण्यासाठी संतुष्टीकरणाचा मार्ग अवलंबला आहे. समाजांमध्ये भेदभाव न करता, त्यांच्यामध्ये कोणताही तणाव निर्माण न करता त्यांना त्यांचे हक्क देणे म्हणजे संतुष्टीकरण असते. हा सामाजिक न्याय आहे, हाच खरा सेक्युलॅरिझम आहे. हाच संविधानाचा सन्मान आहे!
२१ व्या शतकाच्या हवेतील गप्पा
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २१ व्या शतकातील भारताचा विचार म्हणजे केवळ हवेतील गप्पा असल्याची तिरकस टीका मोदींनी केली. मिस्टर क्लीन म्हणवणारे पंतप्रधान २१ व्या शतकाबद्दल बोलत असत पण, त्यांना २० व्या शतकातील गरजा देखील पूर्ण करता आल्या नाहीत. त्यांचे ‘२१ वे शतक’ हे पालूपद ऐकून व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी मार्मिक व्यंगचित्र काढले होते.
तर हे पुस्तक वाचा!
राहुल गांधींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यावरून व चीनच्या संबंधांवरून मोदींना लक्ष्य केले होते, त्यावर मोदींनी उपहासात्मक टीका केली. परराष्ट्र धोरणावर बोलल्याशिवाय आपण परिपक्व राजकारणी होऊ शकत नाही असे काहींना वाटते. ज्यांना या विषयामध्ये स्वारस्य आहे, त्यांना त्याचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी ‘जेएफकेज फरगॉटन क्रायसीस’ हे पुस्तक वाचावे. भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू व अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जेएफ केनडींच्या चर्चांचे वर्णन केलेले आहे. देश मोठ्या संकटातून जात करत असताना विदेश नीतीच्या नावाखाली काय खेळ होत होते हे समजेल, असे मोदी म्हणाले.
‘आम्हीच संविधानाचे रक्षक’
राहुल गांधींसारखे काँग्रेसचे नेते खिशात संविधान घेऊन फिरतात पण, त्यांना संविधानाचे खरे मूल्य व भावना समजलेली नाही. काही मात्र शहरी नक्षलींची भाषा उघडपणे बोलत आहेत. राज्य यंत्रणेविरोधात लढण्याची भाषा करत आहेत. अशांना ना संविधान समजेल ना देशाची एकता समजेल, असे शाब्दिक फटके मोदींनी राहुल गांधींना मारले.
‘बेचारी महिला’ म्हणणे ही विकृती
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर ‘बेचारी महिला’ अशी टिप्पणी केली होती, त्याची दखल घेत, महिला आदिवासी राष्ट्रपतींचा सन्मान करत नाही ही तुमची मर्जी पण, तिचा अपमान का करता? तुमची निराशा समजू शकतो पण, महिला राष्ट्रपतींविरोधात का बोलता, असा सवाल करून, काँग्रेसची ही विकृत मानसिकता असल्याचे मोदी म्हणाले.