PM Modi on Hindu Temple Attacked: कॅनडाच्या ब्रेम्प्टन भागात रविवारी (४ नोव्हेंबर) हिंदू मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेवर संताप व्यक्त होत असताना आता पंतप्रधान मोदींनीही याचा निषेध व्यक्त केला आहे. भारतीय उच्चाधिकारी मंदिराला भेट देण्यासाठी आले असताना सदर हल्ला करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “हिंदू मंदिरांवर जाणीवपूर्वक हल्ला केलेला असून राजनैतिक अधिकाऱ्यांना एकप्रकारे धमकाविण्याचा भ्याड प्रयत्न यातून झालेला आहे.” या हल्ल्यानंतर आता कॅनडाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सांभाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि कॅनडा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सप्टेंबर महिन्यात केला होता. हा आरोप करताना त्यांनी याबाबत ठोस असे पुरावे सादर केले नव्हते. भारताने त्यांच्या आरोपाचे जोरदार खंडन केले. या आरोपानंतर भारताने कॅनडातील सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावून घेतले. तसेच कॅनडाच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याच्या सूचना देण्यात आली.

हे वाचा >> हिंदू भाविकांवरील हल्ला कॅनडा प्रशासनाचं कारस्थान? व्हायरल Video मध्ये महिलेचा टाहो; म्हणाली, “हाच तो”!

या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच कॅनडाबाबत विधान केले आहे. कॅनडामधील खलिस्तानी कट्टरपंथीयांना लक्ष्य करण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात असल्याचाही आरोपही पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याने काही दिवसांपूर्वीच केला होता. भारताने कॅनडाच्या या दाव्याचा स्पष्ट शब्दात विरोध केला असून कॅनडाने केलेले आरोप धादांत खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

खलिस्तानवाद्यांनी याआधीही भारतीय नागरिक, राजनैतिक अधिकाऱ्यांना लक्ष्य केलेले आहे. खलिस्तान्यांच्या कृतीवर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. कॅनडातील खलिस्तानवाद्यांविरोधात भारत ठामपणे उभा असल्याचा संदेश यानिमित्ताने दिला गेला आहे.

हे ही वाचा >> India Canada Row: खलिस्तानी अतिरेक्यांच्या हत्येमागे अमित शाह? कॅनडाच्या आरोपाची अमेरिकेकडून दखल; म्हणाले, “चिंताजनक…”

हिंदू मंदिरावर हल्ला कसा झाला?

कॅनडामध्ये ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराबाहेर रविवारी खलिस्तानी निदर्शक आणि हिंदू धर्मीयांमध्ये संघर्ष उडाला. भारताच्या उच्चायुक्तालयाने हिंदू सभा मंदिराबरोबर संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. ओटावा उच्चायुक्तालय आणि व्हॅनकूव्हर, टोरांटो येथील महावाणिज्य दूतावासांनी संयुक्तपणे छावणी उभारली होती. ‘लोकल लाइफ सर्टिफिकेट’ लाभार्थ्यांच्या सोयीसाठी हिंदू सभा मंदिराबरोबर एका कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. यावेळी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचा विरोध करण्यासाठी सीख फॉर जस्टीस संघटनेचे खलिस्तानवादी कार्यकर्ते तेथे जमले आणि त्यांनी हल्ला केला.

दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही या घटनेचा काल निषेध केला होता. ते म्हणाले, ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरातील हिंसेची कृती स्वीकारार्ह नाही. कॅनडातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा हक्क आहे. या घटनेनंतर समुदायाच्या रक्षणासाठी जलद कृती केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi slams canada hindu temple attack says cowardly attempt to intimidate diplomats kvg