पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वीच भाषण करत काँग्रेसच्या घोटाळ्यांची मालिकाच वाचली. तसंच ज्यांनी नियमांचं पालन करुन भाषण केलं त्या सगळ्यांचं त्यांनी कौतुक केलं. भ्रष्टाचार हा आपल्या देशाची ओळख बनला होता असंही मोदी म्हणाले आहेत. तसंच त्यांनी काँग्रेसला आपल्या खास शैलीत टोले लगावले. मोदी बोलायला उभे राहिल्यानंतर विरोधकांनी मणिपूर, मणिपूरच्या घोषणा दिल्या, तानाशाही बंद करोच्याही घोषणा दिल्या. मात्र मोदींनी त्यांचं भाषण थांबवलं नाही.

काय म्हणाले नरेंद्र मोदी

“पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर जे प्रतिनिधी आले आहेत आणि त्यांनी जे विचार व्यक्त केले. या सगळ्यांनी नियमांचं पालन करुन भाषणं केली आणि विचार मांडले. पहिल्यांदा निवडून येऊनही खासदार म्हणून भाषण करताना त्यांनी लोकसभेचा सन्मान वाढवला” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “देशात एक उत्तम निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामुळे जगासमोर हे उदाहरण ठेवलं गेलं की हे जगातला सर्वात मोठा निवडणूक कार्यक्रम भारतात झाला. मी काही लोकांची वेदना समजू शकतो. कारण वारंवार खोटं बोलूनही त्यांचा पराभव झाला. आम्हाला भारताच्या जनतेने देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. ही बाब लोकशाही मानणाऱ्या आपल्या देशासाठी महत्त्वाची घटना आहे. हा लोकशाहीचा गौरव आहे.” असंही मोदी म्हणाले.

हे पण वाचा- पंतप्रधानांचं भाषण अन् विरोधकांचा गोंधळ, लोकसभेतील ‘या’ दृष्यांमुळे अध्यक्ष राहुल गांधींवर संतापले!

प्रत्येक कसोटीला सामोरं गेल्यावर जनतेने आम्हाला परत निवडलंय

प्रत्येक कसोटीला सामोरे गेल्यानंतर जनतेने आम्हाला निवडलं आहे. आमचा दहा वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड जनतेने पाहिला आहे. जनतेने हे पाहिलं आहे की गरीब कल्याणासाठी आम्ही समर्पण भावाने काम केलं. जनसेवा हीच प्रभूसेवा मानून काम केलं. आम्ही जे कार्य करुन दाखवलं त्यामुळे २५ कोटी गरीब दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं आहे. आम्हाला त्यामुळेच गरीबांचा आशीर्वाद मिळाला आहे. २०१४ मध्ये आम्ही पहिल्यांदा जिंकून आलो तेव्हा निवडणूक प्रचारातही आम्ही सांगितलं होतं की भ्रष्टाचाविरोधात आमचा झीरो टॉलरन्स असेल. आम्हाला आज गर्व आहे की देशाचा सामान्य माणूस भ्रष्टाचाराने पिचला होता. भ्रष्टाचाराविरोधात आमची जी नीती आहे ती पाहूनच आम्हाला तिसऱ्यांदा आशीर्वाद मिळाला. आज जगभरात भारताचं नाव मोठं झालं आहे, भारताचा गौरव झाला आहे. भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

देशाच्या जननेते पाहिलं आहे की राष्ट्र प्रथम ही आमची भावना आहे. आमची नीती, आमचे निर्णय, आमचं काम या सगळ्याचा तराजू एकच आहे, राष्ट्र प्रथम. देशात आवश्यक बदल करायचे होते त्यात आम्ही सातत्य ठेवलं आहे. सबका साथ, सबका विकास हा मंत्र घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत.

देशाने दीर्घ काळ लांगुलचालनाचं राजकारण पाहिलं

आपल्या देशाने दीर्घ काळ लांगुलाचनाचं राजकारण पाहिलं. देशात पहिल्यांदा सेक्युलराझिमचा जो प्रयत्न आम्ही केला. आम्ही तुष्टीकरण नाही तर संतुष्टीकरण आणलं. आम्ही लोकांना आमच्या कामांमधून समाधान दिलं. त्यामुळेच आम्हाला देशाने तिसऱ्यांदा संधी दिली. जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्या निकालाने हे दाखवून दिलं की भारताची जनता विवेकपूर्ण आहे. उच्च आदर्शांचा उपयोग देशाची जनता सद्बुद्धीने करते, त्यामुळेच आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी तिसऱ्यांदा मिळाली आहे. आमची नियत, आमची निती, आमची निष्ठा यावर जनतेने विश्वास दाखवला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. विकसित भारत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खेडेगावांची स्थिती, शहरांची स्थिती यामध्ये सुधारणा होते. मोठ्या प्रमाणावर विकास केला जातो. जगाच्या विकासयात्रेत भारताची शहरं असावीत हे आमचं स्वप्न आहे.

विकसित भारत हे आमचं स्वप्न आहे

मी आज तुमच्या माध्यमातून जनतेला विश्वास देऊ इच्छितो की विकसित भारतासाठी आम्ही निष्ठेने प्रयत्न करु. आमच्या वेळेचा प्रत्येक क्षण आम्ही हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लावू. २४/७ चा नारा आम्ही दिला होता. २०१४ मध्ये जनता निराशेच्या गर्तेत बुडाला होता. २०१४ च्या आधी देशाने सर्वात मोठं नुकसान सहन केलं, सर्वात मोठा ठेवा हरवला होता तो म्हणजे देशाचा आत्मविश्वास. विश्वास आणि आत्मविश्वास गमावला की देश उभा राहणं कठीण असतं. या देशाचं काही होऊ शकत नाही असे उद्गार लोकांच्या तोंडून निघायचे. २०१४ च्या आधी हेच शब्द ऐकू यायचे. भारतीय नागरिकांची निराशाच यातून बाहेर पडत होती. प्रत्येक दिवशी वर्तमानपत्र उघडलं की भ्रष्टाचाराची प्रकरणंच समोर येत होती. रोज नवे घोटाळे, घोटाळ्यांची मालिकाच त्या काळात होती.

बेशरमपणे मान्य केलं जायचं की १ रुपयातले १५ पैसेच पोहचतात

एक कालखंड देशाने पाहिला आहे की ज्यावेळी बेशरमपणे हे मान्य केलं जायचं की दिल्लीतून एखाद्या प्रकल्पासाठी १ रुपया निघाला योजनेपर्यंत १५ पैसे पोहचतात. १ रुपयात ८५ पैशांचा घोटाळा होत होता. घोटाळ्यांच्या खाईत देश बुडाला होता. शिफारस न करता काहीही मिळत नव्हतं. गरीबाला घर घ्यायचं असेल तर लाच द्यावी लागत होती. गॅस कनेक्शनसाठी खासदारांच्या घरी जावं लागायचं. मोफत रेशनही लोकांना मिळत नव्हतं, त्यासाठी लाच द्यावी लागत होती. देशाने २०१४ मध्ये आम्हाला निवडलं आणि तो देशाच्या परिवर्तानाचा प्रारंभ होता. १० वर्षांत आम्ही देशाचा आत्मविश्वास परत आणला. आज देशाचा आत्मविश्वास दुणावला आहे, भारत काहीही करु शकतो हे देशातल्या सामान्य माणसाला वाटतं.

कोळसा घोटाळ्यात अनेकांचे हात काळे झाले

एक काळ होता जेव्हा कोळसा घोटाळ्यात अनेकांचे हात काळे झाले होते. आज कोळशाचं सर्वाधिक उत्पादनाचे विक्रम आपण केले आहेत. आता देश म्हणतोय की आपण काहीही करु शकतो. एक काळ असा होता २०१४ च्या आधी फोन बँकिंग करुन बँक घोटाळे करण्यात आले. बँकेची संपत्ती व्यक्तिगत प्ऱॉपर्टी म्हणून लुटण्यात आला. आम्ही २०१४ नंतर ही धोरणं बदलली. त्यामुळेच आपल्या देशांचं नाव जगातल्या प्रसिद्ध बँकांमध्ये घेतलं जाऊ लागलं असं नरेंद्र मोदी म्हणाले.