Narendra Modi Haryana Rally: हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राज्यात प्रचारसभा घेत आहेत. सोनीपतमध्ये बुधवारी झालेल्या प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसच्या १० वर्षांपूर्वीच्या कारभारावर टीका करताना मोदींनी भ्रष्टाचाराला काँग्रेसनंच जन्म दिल्याचा उल्लेख केला. तसेच, यावेळी त्यांनी काँग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षण विरोध असल्याचंही विधान केलं. पुढील महिन्यात ५ ऑक्टोबर रोजी हरियाणामध्ये एकाच टप्प्यात मतदान होत असून ८ ऑक्टोबरला हरियाणा व जम्मू-काश्मीरसाठीची मतमोजणी पार पडेल.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणातील सोनीपतमध्ये बोलताना काँग्रेसकडून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप केला. “आता जगभरातले लोक भारतात कंपनी उघडण्यासाठी येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे तुम्हीच विचार करा, हरियाणात कसं सरकार असायला हवं? हरियाणात उद्योगांना प्रोत्साहन देणारं भाजपा सरकार गरजेचं आहे. नोकऱ्या वाढवणारं भाजपा सरकार गरजेचं आहे. तुम्हालाही माहिती आहे, जिथे कुठे काँग्रेसचं सरकार आलं, जिथे त्यांना संधी मिळाली, जिथे जिथे काँग्रेसनं पाऊल ठेवलं, तिथे एक गोष्ट नक्की झाली. भ्रष्टाचार आणि घराणेशाही”, असं मोदी यावेळी म्हणाले.

“भारताच्या सरकारी व्यवस्थेत भ्रष्टाचाराला जन्म देणारी, भ्रष्टाचाराचं पालन-पोषण करणारी, आपल्या देशात भ्रष्टाचाराची कुणी जन्मदात्री असेल तर ती काँग्रेस पार्टी आहे. काँग्रेसचा शाही परिवार देशाचा सर्वात भ्रष्ट परिवार आहे. जिथे हाय कमांडच भ्रष्टाचारी असतं, तिथे खालच्या लोकांना लुटीचा खुला परवाना मिळतोच”, असंही मोदी म्हणाले.

“काँग्रेसनं हरियाणाला जावयांच्या हाती सोपवलं”

दरम्यान, यावेळी काँग्रेसवर खोचक शब्दांत टीका करताना त्या पक्षानं हरियाणाला दलाल व जावयांच्या हाती सोपवलं, असं मोदी म्हणाले. “आठवून बघा, १० वर्षांपूर्वी जेव्हा इथे काँग्रेस सरकार होतं, तेव्हा काय व्हायचं? आज जे १८-२० वर्षांचे नवे मतदार आहेत, त्यांना तर माहितीही नसेल की १० वर्षांपूर्वी हरियाणातल्या शेतकऱ्यांना कसं लुटलं गेलं. तेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर लुटल्या गेल्या. काँग्रेसनं हरियाणाला दलाल व जावयांच्या हाती सोपवून दिलं होतं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“…तरच हरियाणा वाचू शकेल”

“कोणकोणत्या काँग्रेस नेत्यांवर आरोप झाले आहेत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. हरियाणात एकही नोकरी अशी नव्हती जिथे पैशांचे व्यवहार होत नव्हते. सरकारी कंत्राटांमध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता. हरियाणाला लुटून खाणाऱ्या भ्रष्ट काँग्रेसला सरकारपासून लांबच ठेवायचं आहे. तरच हरियाणा वाचेल”, असा उल्लेख यावेळी नरेंद्र मोदींनी केला.

Ravinder Raina’s Asset: भाजपाचा सर्वात गरीब उमेदवार; फक्त १००० रुपये रोख एवढीच संपत्ती, आमदारकीची पेन्शनही करतात दान!

“आरक्षणविरोध काँग्रेसच्या डीएनएमध्ये”

“काँग्रेसच्या शाही परिवारातून जो कुणी पंतप्रधान झाला, त्यानं आरक्षणाला विरोध केला. आरक्षणाला विरोध काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे. त्यामुळेच आजही काँग्रेसच्या शाही कुटुंबातली चौथी पिढीदेखील आरक्षणाला हटवण्याची चर्चा करते”, अशी टीकाही त्यांनी केली.