केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात या विधानावरून विरोधकांनी रान उठवलेलं असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतही विरोधकांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केला. संसदेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कामकाज तहकूब करण्याचीही वेळ ओढवली. आता अमित शाह यांनी केलेल्या विधानाबाबत विरोधकांच्या टीकेला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“जर काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला असं वाटत असेल की त्यांच्या या दुष्ट अपप्रचारामागे गेल्या अनेक वर्षांपासून ते करत असलेले गैरप्रकार लपवू शकतात, विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यासारखे प्रकार, तर ही त्यांची मोठी चूक ठरेल. भारताच्या नागरिकांनी वेळोवेळी हे पाहिलं आहे की कसं एका कुटुंबाच्या ताब्यात असणाऱ्या एका पक्षानं डॉ. आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींचा अवमान करण्यासाठी शक्य त्या सर्व कुटिल गोष्टी केल्या”, असं पंतप्रधान मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

मोदींनी दिली यादी, काँग्रेसवर आरोप

दरम्यान, मोदींनी या पोस्ट्समध्ये एक यादीच दिली असून त्यातून काँग्रेसनं कशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, यासंदर्भात दावे केले आहेत. “एकदा नसून दोनदा बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकांमध्ये पराभव करणे, पंडित नेहरूंनी डॉ. आंबेडकरांविरोधात प्रचार करणे आणि त्यांचा पराभव मोठा मुद्दा करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतरत्न’ नाकारणे, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पोर्ट्रेट लावण्यास नकार देणे या गोष्टींचा काँग्रेसनं डॉ. आंबेडकरांचा अवमान केलेल्या गोष्टींच्या यादीत समावेश होतो”, असंही पंतप्रधानांनी पुढे म्हटलं आहे.

“काँग्रेस त्यांना हवा तेवढा प्रयत्न करून शकते, पण ते हे नाकारू शकत नाहीत की अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींविरोधातील भीषण हत्याकांड त्यांच्याच काळात झाले आहेत”, असं नमूद करतानाच “काँग्रेस अनेक वर्षं सत्तेत राहिली आहे. पण त्यांनी एससी-एसटी समुदायाच्या विकासासाठी ठोस असं काहीही केलेलं नाही”, असंही मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

अमित शाह यांच्या विधानाचा केला उल्लेख

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये अमित शाह यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणाचाही उल्लेख केला. “संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा अवमान केल्याचा काळा इतिहासच संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी उघड केला. अमित शाह यांनी मांडलेल्या तथ्यांमुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यामुळेच त्यांनी ही नाटकं सुरू केली आहेत. पण दुर्दैवाने लोकांना सत्य काय आहे याची पूर्ण कल्पना आहे”, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.

अमित शाह यांनी आंबेडकरांवर केलेली टिप्पणी वादात? काँग्रेसकडून टीका, माफी मागण्याची मागणी

काय म्हणाले होते अमित शाह?

मंगळवारी राज्यसभेत बोलताना अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत केलेल्या विधानावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “हल्ली फॅशनच झाली आहे. “आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल”, असं अमित शाह म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi slams congress on targeting amit shah for dr babasaheb ambedkar comments pmw