पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ ऑक्टोबर) दिल्लीत ७ व्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी देशभरातील निवडक संस्थांमधील १०० नवीन ५ जी लॅबचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्या देशात ५ जी नेटवर्क विस्तारत आहे. मोबाइल ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत आपण जगात ४३ व्या क्रमांकावर आहोत. आमच्या सरकारच्या काळात देशात ४ जी सेवा विस्तारली. आता आपण ६ जी तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर टीका केली. मोदी म्हणाले, २०१४ मध्ये काय झालं होतं माहितीय ना? २०१४ ही केवळ तारीख नाही तर एक परिवर्तन आहे. २०१४ मध्ये देशात केवळ १०० स्टार्टअप होते, आज देशात १ लाख स्टार्टअप आहेत. तुम्ही १०-१२ वर्षांपूर्वीचा काळ आठवून पाहा. तेव्हा आऊटडेटेड मोबाइल फोनची स्क्रीन सतत हँग व्हायची. तुम्ही त्याची बटनं दाबा, स्क्रीन स्वाईप केली तरी फोन काम करत नव्हते. ते फोन रिस्टार्ट करूनही काहीच होत नव्हतं. अशीच अवस्था देशातल्या तेव्हाच्या सरकारची होती. तेव्हाचं सरकार हँग व्हायचं.

नरेंद्र मोदी म्हणाले, मोबाइलची आणि देशाची परिस्थिती पाहता देशातल्या लोकांनी आऊटडेटेड फोन आणि आऊटडेटेड सरकार सोडून आम्हाला संधी दिली. २०१४ मध्ये नागरिकांनी आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी दिली. या परिवर्तनामुळे काय झालं ते सांगायची आवश्यकता नाही. कारण तंत्रज्ञानाच्या जगात आता सगळं काही स्पष्ट दिसतंय. तेव्हा आपण मोबाईल फोन आयात करत होतो. आता आपण मोबाईल फोनची निर्यात करतो.

हे ही वाचा >> “इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ५० ओलीस ठार”, हमासचा दावा; गुप्तचर अधिकारी म्हणाले…

पंतप्रधान यावेळी म्हणाले, इंटरनेटचं स्पीड वाढल्यामुळे आपलं जीवन सुखद झालं आहे. त्यामुळेच आम्ही तंत्रज्ञानावर भर देतोय. याचा सर्वांना फायदा मिळेल यासाठी सरकार काम करत आहे. प्रत्येक क्षेत्रात लोकशाहीची ताकद पाहायला मिळतेय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi slams congress says previous government was like hanged phone asc
Show comments