Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत जोरदार भाषण करत विरोधकांची पिसं काढण्याचं काम केलं. हा देश संविधानानुसारच चालणार, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. या त्यांच्या टीकेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. आम्ही संविधान जगणारे लोक आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

“निवडणुकीच्या वेळी काही पक्ष आम्ही हे करु ते करु अशी आश्वासनं देतात मात्र ती पूर्ण करत नाहीत. आमचं धोरण असं नाही. आम्ही जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. संविधानाला बळकटी देण्यासाठी आम्ही संविधान जगण्याचं काम करत आहोत. मी त्याची काही उदाहरणं देऊ इच्छितो, आम्ही संविधान जगणारे लोक आहोत.”

मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा…

आपल्याकडे ही परंपरा आहे की राष्ट्रपती जेव्हा अभिभाषण करतात तेव्हा त्या देशात काय काय कार्य झालं ते सांगतात. संविधान आणि लोकशाहीचं स्पिरिट काय असतं ? गुजरातला जेव्हा ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी आम्ही ठरवलं की मागच्या ५० वर्षांत सदनात जेवढी राज्यपालांची भाषणं झाली ती भाषणं त्याचं पुस्तक तयार केलं. तो ग्रंथ आजही अनेक वाचनालयांमध्ये उपलब्ध आहेत. मी भाजपाचा आहे तरीही आम्ही सगळ्या राज्यपालांच्या भाषणांचं पुस्तक केलं. कारण आम्ही संविधानाचा आत्मा काय ते आम्हाला माहीत आहे, ते आम्ही जगतो.

२०१४ मध्ये सत्ता आली तेव्हा विरोधी पक्षच नव्हता-मोदी

२०१४ मध्ये आमची सत्ता आली तेव्हा विरोधी पक्षच लोकसभेत नव्हता. त्यावेळी भारतात कायदे असे होते ज्यात आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य होतो. अनेक समित्यांबाबत हे लिहिलं होतं की विरोधी पक्षनेते येतील. मात्र आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. त्यामुळे सन्मानीय विरोधी पक्षनेते नसले तरीही सगळ्या बैठकांना आम्ही सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला बोलवलं. लोकशाहीचा आत्मा यालाच म्हटलं. निवडणूक आयोगाच्या समितीतही विरोधी पक्षाचे लोक आहेत. आम्ही त्यासाठी एक कायदाही आणला आहे. निवडणूक आयोगाची स्थापना होताना विरोधी पक्षही समितीत असेल हे आम्ही त्याद्वारे सांगितलं. आम्ही संविधान जगणारे लोक आहोत.

स्टॅच्यू ऑफ युनिटी आम्ही उभारला कारण आम्ही संविधान जगणं जाणतो-मोदी

दिल्लीत अनेक जागा अशा आहेत जिथे अनेक कुटुंबांनी त्यांची संग्रहालयं उभारली आहेत, जनतेच्या पैशांतून ती संग्रहालयं उभारली आहेत. आम्ही पंतप्रधान संग्रहालय तयार केलं आहे, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सगळ्यांचा समावेश त्यात आहे. माझी तर इच्छा आहे की पीएम म्युझियममध्ये जे महापुरुष आहे त्यांच्या कुटुंबांनी, पुढच्या पिढीने ते पाहिलं पाहिजे. काही कमतरता असली तर ते सरकारला सांगितलं पाहिजे. आपल्यासाठी जगणाऱ्यांची कमतरता नाही पण आम्ही संविधानासाठी जगणारे लोक आहोत. सत्ता जेव्हा सेवा होते तेव्हा राष्ट्रनिर्मिती होते. जेव्हा सत्तेला जहागिरी म्हणून पाहिलं जातं तेव्हा लोकशाही संपते. आम्ही संविधानाची भावना घेऊन चाललो आहोत, विषारी राजकारण करणं आम्हाला जमत नाही. देशाचं ऐक्य हे आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात मोठा पुतळा आम्ही तयार केला आहे. सरदार पटेल जनसंघ किंवा भाजपाचे नव्हते. पण आम्ही संविधान जगणारे लोक आहोत त्यामुळे त्यांचं इतकं मोठं शिल्प उभं केलं आहे.

खिशात संविधान फिरणाऱ्यांना…

काही लोक शहरी नक्षलवादाची भाषा खुलेपणाने बोलत आहेत. हे लोक संविधान काय समजणार? देशाचं ऐक्य यांना कसं समजणार? सात दशकं, जम्मू काश्मीर आणि लडाख संविधानाच्या अधिकारापासून वंचित होतं. हा अन्याय नव्हता का? आम्ही अनुच्छेद ३७० ची भिंत पाडली. आता त्या दोन्ही राज्यांना देशातल्या लोकांप्रमाणेच अधिकार आणि हक्क मिळत आहेत. संविधानाचं महत्त्व आम्हाला माहीत आहे त्यामुळे असे बळकट निर्णय आम्ही घेतले आहेत. आपलं संविधान भेदभाव करण्याचा अधिकार देत नाही. जे लोक खिशात संविधान घेऊन फिरतात त्यांना हे कळणार नाही की मुस्लिम महिलांवर तुम्ही काय वेळ आणली होती. आम्ही ट्रिपल तलाकचा खात्मा केला आणि संविधानानुसार मुस्लिम मुलींना समानतेचा अधिकार दिला असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं.