पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीत ‘बी-२० समिट’ला संबोधित केलं. या कार्यक्रमाला जगभरातील उद्योगविश्वातील अनेक उद्योगपती आणि अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमातून नरेंद्र मोदी यांनी भारताच्या चांद्रयान मोहीमेचं कौतुक केलं. चांद्रयान मोहीम यशस्वी करण्यामध्ये इस्रोची भूमिका खूप मोठी आहे. पण यामध्ये भारताच्या उद्योगजगतानेही हातभार लावला आहे, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं. ते ‘बी-२० समिट’मध्ये बोलत होते.
उद्योगविश्वातील मंडळींना उद्देशून पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, “तुम्ही सर्व उद्योजक भारतात अशावेळी आला आहात, ज्यावेळी आमच्या संपूर्ण देशात उत्सव साजरा केला जात आहे. भारतात दरवर्षी साजरा होणाऱ्या सणांचा उत्सव एकप्रकारे लवकर सुरू झाला आहे. हा उत्सव समाज आणि उद्योगजगतही एकत्रित साजरा करत असतो. यावेळी हा उत्सव २३ ऑगस्टपासूनच सुरू झाला आहे. हा उत्सव भारताने चंद्रावर चांद्रयान-३ यशस्वीपणे उतरवण्याचा आहे.”
“भारताच्या चंद्र मोहिमेला यशस्वी करण्यामध्ये भारताची अंतराळ संस्था इस्रोची खूप मोठी भूमिका आहे. पण यामध्ये भारतीय उद्योगानेही खूप मोठं सहकार्य केलं आहे. चांद्रयानात वापरलेले अनेक घटक आमच्या उद्योगजगताने, खासगी कंपन्यांनी, मध्यम व लघु उद्योगांनी आवश्यकतेनुसार आणि वेळेवर उपलब्ध करुन दिले. चांद्रयान मोहीम हे विज्ञान आणि उद्योगाचं एकत्रित यश आहे,” असं पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “याचं वेगळेपण म्हणजे भारतासह संपूर्ण जग याचा उत्सव साजरा करत आहे. हा उत्सव हा जबाबदारीने अवकाश मोहीम राबवण्याचा आहे. हा उत्सव देशाच्या विकासाला गती देण्याचा आहे. हा उत्सव नाविन्यतेचा आहे. हा उत्सव अंतराळ संशोधनाच्या माध्यमातून शाश्वत विकास आणि समानता आणण्याचा आहे. हीच ‘बी-२० समिट’ची थीम आहे.”