राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं भाषण हे देशाच्या विकासाला गती देणारं भाषण होतं. त्यावर कुणी टीका केली, कुणी त्याची प्रशंसा करणं जी बाब स्वाभाविक आहे. पाच दशकं आपण गरिबी हटाओच्या घोषणा ऐकल्या आहेत. पण २५ कोटी गरीब हे दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत ते मागच्या दहा वर्षांत झालं आहे. त्यासाठी योजनाबद्ध गोष्टी कराव्या लागतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

जमिनीशी नाळ जोडले गेलेले लोकच कष्टकऱ्यांसाठी आयुष्य समर्पित करतात-मोदी

जमिनीशी नाळ जोडलेले लोक, जमिनीवरच्या कष्टकऱ्यांसाठी आयुष्य समर्पित करतात तेव्हा बदल घडतो. आमच्या सरकारने गरीबांना खोट्या घोषणा नाही तर वास्तवातला विकास दिला. सामान्य माणसाला होणाऱ्या वेदना, त्यांची स्वप्नं अशीच समजत नाहीत. त्यासाठी एक दृष्टीकोन असावा लागतो, इच्छाशक्ती लागते. मला आज हे सांगताना दुःख होत आहे की काही लोकांकडे असा दृष्टीकोनच नाही. पावसाळ्याच्या दिवसात कच्च्या घरात, प्लास्टिकचं छत शाकारुन लोक दिवस काढतात. ही बाब किती कठीण आहे, स्वप्नं कशी मातीत मिसळतात हे प्रत्येकाला समजत नाही. आजवर गरीबांना चार कोटी घरं मिळाली आहेत. ज्यांनी आयुष्य तुटक्या छताखाली काढलं आहे त्याला पक्क्या घराचं महत्त्व कळतं.

आम्ही गरिबांसाठी भरीव काम केलं-मोदी

एखाद्या महिलेला उघड्यावर नैसर्गिक विधी करायला जावं लागत होतं, त्या महिलेचं दुःख, वेदना काय? ते अनेकांना कळणार नाही. आम्ही १२ कोटींहून अधिक शौचालयं बांधून बहिणींचं, मुलींची ही समस्या सोडवली. आजकाल सोशल मीडियावर चर्चा होत आहे की काही नेत्यांचा फोकस जकुजी, स्टायलीश शॉवर्सवर असतो, आमचा फोकस तो नाही आमचा फोकस प्रत्येक घरात पाणी पोहचवण्यावर आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्षे झाल्यानंतरही १६ कोटी घरांमध्ये नळाची जोडणी नव्हती. आमच्या सरकारने १२ कोटी घरांमध्ये नळ जोडणी केली असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आम्ही गरीबांसाठी जे काही काम केलं ते राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात विस्ताराने सांगितलं.

अनेकांना गरीबांचा विषय निघाला की कंटाळा येतो-मोदी

जे लोक गरीबांच्या झोपड्यांमध्ये जाऊन फोटोसेशन करतात आणि मनोरंजन करतात त्यांना संसदेत गरीबांबाबत काही बोललं गेलं तर ते त्यांना कंटाळवाणंच वाटणार. मी त्यांचा राग, रोष सगळं समजू शकतो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला. एखादी समस्या ओळखता येणं ही एक बाब आहे, पण जबाबदारी घेऊन ती समस्या सोडवणं, त्यासाठी प्रयत्न करणं ही वेगळी बाब आहे. आम्ही मागच्या दहा वर्षांमध्ये गरीबांच्या समस्यांवर उत्तर शोधणं हाच असतो.

आपल्या देशाच्या एका पंतप्रधानांनीच सांगितलं होतं…

आपल्या देशात एक पंतप्रधान होऊन गेले त्यांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं. त्यांनीच हे म्हटलं होतं की दिल्लीतून जेव्हा एक रुपया निघतो तेव्हा गावांमध्ये १५ पैसे पोहचतात. त्या कालावधीत तर पंचायत ते पार्लमेंट एकाच पक्षाचं राज्य होतं. त्यावेळी त्याच पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं होतं. अत्यंत खुबीने केलेली ती हातसफाई होती. १५ पैसे कुणाकडे जात होते ते पण सामान्य माणसांना माहीत आहे. आता देशाने आम्हाला संधी दिली आम्ही समस्यांवर उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. बचतही करायची आणि विकासही करायचा हे आमचं मॉडेल आहे. जनतेचा निधी जनतेसाठी वापरला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Story img Loader