संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जुन्या संसद भवनाच्या उज्ज्वल परंपरेविषयी सर्व सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंतचे पंतप्रधान, लोकसभा व त्यावेळी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा उल्लेख केला. यावेळी मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी केलेल्या मध्यरात्रीच्या भाषणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच, आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात संसदेच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचा उल्लेख करताना स्वातंत्र्यापासूनचे संदर्भ दिले. “पंडित नेहरूंना अनेक बाबतीत लक्षात ठेवलं जातं. पण याच सभागृहातला पंडित नेहरूंचा मध्यरात्रीच्या भाषणाचा आवाज आपल्या सर्वांना प्रेरित करतो. याच सभागृहात अटलजींनी सांगितलं होतं की सरकारं येतील-जातील. पक्ष बनतील, फुटतील. पण हा देश कायम राहिला पाहिजे. पंडित नेहरूंच्या सुरुवातीच्या मंत्रीमंडळ बैठकीत बाबासाहेब आंबेडकर एक मंत्री म्हणून होते. तेव्हा जगातल्या सर्वोत्तम गोष्टी भारतात आणण्यावर त्यांचा जोर असायचा. कारखाना कायद्यात आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा समावेश करून घेण्यात बाबासाहेब आंबेडकर सर्वाधिक आग्रही असायचे. त्याचा आज देशाला लाभ होतोय. आंबेडकरांनी नेहरूंच्या सरकारमध्ये असताना देशाला पाणी धोरण दिलं होतं”, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
“रडारड करायला भरपूर वेळ आहे, तुम्ही…”, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला!…
पहिल्या मंत्रीमंडळाचं केलं कौतुक
“बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की भारतात सामाजिक न्यायासाठी भारताचं औद्योगिकरण होणं गरजेचं आहे. कारण देशाच्या मागासवर्गाकडे जमिनीच नाहीयेत. तो काय करेल? याच गोष्टीवर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी पंडित नेहरूंच्या मंत्रीमंडळात असताना उद्योग धोरण देशात आणलं. आजही देशात कितीही उद्योग धोरणं झाली, तरी त्यांचा आत्मा पहिल्या सरकारमध्ये असतानाच्या धोरणाचाच असतो”, असं म्हणत पंतप्रधानांनी पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालील देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळाचं कौतुक केलं.
“लालबहादूर शास्त्रींनी १९६५च्या युद्धात देशाच्या जवानांना याच सभागृहातून प्रेरणा दिली होती. इथूनच त्यांनी हरित क्रांतीचा मजबूत पाया रचला होता. बांगलादेशाच्या मुक्तीचं आंदोलन आणि त्याचं समर्थनही याच सभागृहानं इंदिरा गांधींच्या नेतृत्वात केलं होतं. याच सभागृहानं आणीबाणीच्या काळात लोकशाहीवरील हल्लाही पाहिला होता. याच सभागृहानं मजबूत लोकशाही परत येतानाही पाहिली होती”, असं म्हणत मोदींनी इंदिरा गांधींच्या सत्ताकाळाचाही उल्लेख केला.
“याच सभागृहात चरणसिंह यांनी ग्रामीण मंत्रालयाची स्थापना केली होती. याच सभागृहात मतदानाचं वय २१ वरून १८ करण्याचा निर्णय झाला होता. आपल्या देशानं आघाड्यांचं सरकार पाहिलं. आर्थिक धोरणांच्या ओझ्याखाली देश दबला होता. पण नरसिंहराव सरकारच्या काळात जुन्या आर्थिक धोरणांना सोडून नव्या वाटा चोखाळण्याचा निर्णय घेतला. त्याचे परिणाम आज या देशाला उपभोगायला मिळत आहेत”, असं ते म्हणाले.
“याच सभागृहात अटलजींचं सरकार एका मतानं पडलं”
“अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळातील सर्वशिक्षा अभियान देशात आजही महत्त्वाचं ठरतंय. याच सभागृहात मनमोहन सिंगांच्या सरकारच्या काळातील कॅश फॉर व्होटचा प्रकारही लोकांनी पाहिला. गेल्या १० वर्षांत अनेक प्रलंबित विषयांवरील कायमस्वरूपी उपाय याच सभागृहानं पाहिला. कलम ३७०ही याच सभागृहानं गर्वाने पाहिला. जीएसटीही याच सभागृहात अस्तित्वात आला. हे तेच सभागृह आहे, जिथे कधीकाली चार सदस्य असणारा पक्ष सत्तेत होता आणि १०० सदस्यांचा पक्ष विरोधात बसला होता. हे तेच सभागृह आहे, जिथे एका मतानं अटलजींचं सरकार कोसळलं होतं आणि लोकशाहीचं महत्त्व वाढवण्यात आलं होतं”, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.
Video: “कधी रात्रभर चाललेल्या सभागृहाला…”, पंतप्रधान मोदींनी मानले संसदेतील कर्मचाऱ्यांचे आभार!
“आजचा दिवस या सभागृहातील आजपर्यंत झालेल्या साडेसातहजार लोकप्रतिनिधींच्या गौरवाचा दिवस आहे. या भिंतींकडून आपल्याला जी प्रेरणा मिळाली, जो नवीन विश्वास मिळाला, तो घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. बऱ्याच गोष्टी अशा होत्या, की ज्याला या सभागृहातील प्रत्येकाच्या टाळ्या हव्या होत्या. पण कदाचित राजकारण त्याच्याही आड येत होतं. नेहरूंच्या योगदानाचा गौरव या सभागृहात होत असेल, तर कोणता सदस्य असा असेल, ज्याला टाळ्या वाजवाव्याशा वाटणार नाहीत?” असा सवालही मोदींनी विरोधकांना केला.