संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात केंद्र सरकारकडून ८ विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी मांडली जाणार आहेत. आज सकाळी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले जाणार” असं सूचक विधान केल्यामुळे मंजुरीसाठी येणाऱ्या विधेयकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आज जुन्या संसद भवनातील शेवटचा दिवस असून संसद भवनाच्या कामकाजाच्या परंपरेविषयी सभासदांनी आपल्या भूमिका मांडल्या. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही आभार मानले.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात लोकसभा अध्यक्ष व राज्यसभा सभापतींपासून, सर्व खासदारांपासून ते संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे आभार मानले. “हे खरंय की आपण लोकप्रतिनिधी आपापल्या भूमिका पार पाडत असतो. पण सातत्यानं आपल्यामध्ये जी ही टोळी बसते (सत्ताधारी व विरोधकांमध्ये लंबवर्तुळाकार टेबलवर बसणारे कर्मचारी), त्यांच्याही अनेक पिढ्या बदलल्या आहेत. कधी कागद घेऊन ते धावत असतात. त्यांचंही योगदान कमी नाहीये”, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
“आपल्याला कागदपत्र पोहोचवण्यासाठी ते धावपळ करत असतात. सभागृहात काही चूक होऊ नये, यासाठी ते चौकस असतात. जे काम त्यांच्याकडून झालंय, त्यामुळेसुद्धा सभागृहातील कामकाज चांगलं व वेगाने होण्यासाठी मदत झालीये. मी त्या सर्व साथीदारांचं आणि त्यांच्या पूर्वजांचंही मनापासून अभिनंदन करतो”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
“रडारड करायला भरपूर वेळ आहे, तुम्ही…”, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला!…
“कुणी आपल्याला चहा पाजला असेल, कुणी पाणी दिलं असेल”
“संसद म्हणजे फक्त हे सभागृहच नाही. या पूर्ण परिसरात अनेक लोकांनी कधी आपल्याला चहा पाजला असेल, कुणी पाणी पाजलं असेल. कुणी रात्र-रात्र चाललेल्या सभागृहाला कधी भुकेल्या पोटी राहू दिलं नसेल. अनेक प्रकारच्या सेवा दिल्या असतील. कुणी बाहेरच्या पर्यावरणाची काळजी घेतली असेल, कुणी साफसफाई केली असेल. न जाणो कितीतरी अगणित लोक असतील, ज्यांनी आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने काम करता यावं आणि इथे जे काम होईल, ते देशाला पुढे वाटचाल करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात ज्या ज्या व्यक्तीने योगदान दिलंय, त्यांचं माझ्याकडून व या सभागृहाकडून मी विशेष आभार व्यक्त करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केलं.