PM Narendra Modi on Mahatma Jyotirao Phule: पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आज त्यांनी वाराणसीचा दौरा करत याठिकाणी ३९०० कोटी रुपयांच्या ४४ विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. मागच्या १० वर्षांत वाराणसीने विकासाची गती साधली असून आज काशी फक्त पुरातन शहर नाही तर प्रगतीशील शहर झाले असल्याचे ते यावेळी म्हणाले. याबरोबरच आज महात्मा जोतीराव फुले यांची जयंती (११ एप्रिल) असल्यामुळे त्यांनी फुलेंच्या कार्याचाही उल्लेख केला. आपण फुलेंच्या विचारानुसार काम करत असल्याचे ते म्हणाले.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
“महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती आहे. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर नारीशक्तीच्या हितासाठी, त्यांचा आत्मविश्वास आणि समाज कल्याणासाठी काम केले. फुलेंचे विचार, त्यांचा संकल्प आणि नारीशक्तीसाठी त्यांनी सुरू केलेली चळवळ पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. या कामाला नवी ऊर्जा देत आहोत. महात्मा फुलेंसारख्या त्यागी, तपस्वी महापुरूषांकडून प्रेरणा घेऊनच आम्ही देशसेवेचा मंत्र जपत आहोत. ‘सबका साथ, सबका विकास’, हा विचार आम्ही त्यांच्याकडून घेतला”, असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
विरोधकांवर टीका
“जे लोक सत्ता हस्तगत करण्यासाठी दिवसरात्र खेळ खेळत असतात, त्यांचा एकच संकल्प आहे. तो म्हणजे, कुटुंबाची साथ आणि कुटुंबाचाच विकास, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवरही टीका केली.
सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांना विचारला जाब
काशीमध्ये काही दिवसांपूर्वीच एका १९ वर्षीय मुलीवर २३ जणांनी सहा दिवस बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. २९ मार्च रोजी पीडितेला तिच्या मित्राने स्वतःबरोबर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुढचे सहा दिवस २३ आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. सदर गुन्हा घडल्यानंतर संपूर्ण वाराणसीत खळबळ उडाली होती. पोलिसांनी १० आरोपींना अटक केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बाबतपूर विमानतळावर उतरताच त्यांनी वाराणसीचे पोलीस आयुक्त, मंडल आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाच्या तपासाबाबत जाब विचारला. सर्व आरोपींना तात्काळ जेरबंद करत कडक कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.