संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पाच दिवसांच्या या अधिवेशनामध्ये एकूण ८ विधेयकांवर चर्चा होणार असल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय, नव्या संसद भवनातही याच अधिवेशनापासून कामकाजाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कमी कालावधीचं हे अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं नमूद करतानाच विरोधकांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
संसदेच्या विशेष अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेतले जाणार असल्याचं सूचक विधान यावेळी मोदींनी केलं. “गेल्या ७५ वर्षात जो प्रवास देशाने केला तो प्रेरक आहे. आता आपल्याला नवे संकल्प सोडायचे आहेत. आपण नव्या संसदेत अधिवेशन घेत आहोत. हे अधिवेशन छोट्या कालावधीसाठी असलं तरीही देशासाठी महत्त्वाचं. या अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेतले जाणार आहेत”, असं मोदी म्हणाले.
“२०४७ पर्यंत या देशाला आपल्याला विकसित देश बनवायचंय. यापुढचे सर्व निर्णय या नव्या संसद भवनात होणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण आहे”, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांना टोला
दरम्यान, यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावला. “मी सर्व सदस्यांना आग्रह करेन की हे छोटं अधिवेशन आहे. तुमचा जास्तीत जास्त वेळ या अधिवेशनाला मिळावा. रडारड करण्यासाठी बराच वेळ आहे. ते तुम्ही करत राहा. आयुष्यात असे काही क्षण येतात, जे आपल्यात विश्वास निर्माण करतात. मी या छोट्या अधिवेशनाला त्या दृष्टीने पाहातो. मी आशा करतो की जुने वाद सोडून, चांगल्या गोष्टी सोबत घेऊन आपण नव्या संसदेत प्रवेश करू”, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
“संसदेच्या विशेष अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले संकेत
चांद्रयान व जी-२० चा केला उल्लेख!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी चांद्रयान ३ मोहीम व जी-२० परिषदेचाही उल्लेख केला. “चांद्रयान ३ यशस्वी झालं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला तिरंगा फडकतो आहे ही गौरवाची बाब आहे. संपूर्ण जगात आज आपल्या देशाचं नाव घेतलं जातं आहे. आपलं सामर्थ्य आता जगाला कळलं आहे. जी २० परिषदेच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं यश मिळालं. भारताची विविधता आणि एकता यांचं दर्शन या परिषदेत झालं. आपण ग्लोबल साऊथचा आवाज झालो आहोत. भारताच्या उज्ज्वल भविष्याचे हे संकेत आहेत”, असं मोदी म्हणाले.