मागच्या दीड महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला होता, आज तो थंडावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा देत जोरदार प्रचार केला. यादरम्यान त्यांनी २०६ सभा आणि रोड शो घेतले. तर ८० हून अधिक मुलाखती दिल्या. दरम्यान, प्रचारसभांचे द्विशतक झळकवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ध्यान करण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान सुरू केलं आहे. आज सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी इथं ध्यान करण्यास सुरुवात केली. ते पुढील ४५ तास ध्यान करणार आहेत. इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार, या काळात ते मौन राहणार असून केवळ नारळाचं पाणी, द्राक्षांचा रस किंवा तत्सम पदार्थांचा आहार ते घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ जूनच्या सायंकाळपर्यंत ध्यान करणार असून त्यानंतर ते दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा – पंतप्रधान मोदी विवेकानंद स्मारकामध्ये ४८ तास ध्यानात बसणार; या वास्तूचे काय आहे वेगळेपण?
महत्त्वाचे म्हणजे या दोन दिवसांत प्रवाशांना कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यात बंदी घालण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज सांयकाळी प्रचार संपवून वाराणसी येथून कन्याकुमारीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम भगवती अम्मन मंदिर इथं पूजा केली. पुजा केल्यानंतर ते थेट विवेकानंद रॉक मेमोरियल इथं पोहोचले.
२०१९ साली केदारनाथ गुहेत केले होते ध्यान
२०१९ सालीही निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा केली होती. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे गेले होते. तेथील रुद्र गुहेत त्यांनी ध्यानधारणा केली होती. यावेळी ते कन्याकुमारी येथे जात आहेत.
हेही वाचा – मान्सून आला हे नक्की कसे समजते? मान्सून ऑनसेट म्हणजे काय? जाणून घ्या…
यंदा कन्याकुमारीची निवड का?
कन्याकुमारीच्या रॉक मेमोरियल येथे ध्यान केल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी भारतासाठीचे आपले विचार व्यक्त केले होते. या जागेचा स्वामी विवेकानंद यांच्यावर फार प्रभाव पडला होता. ज्याप्रकारे सारनाथी भूमी गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाचा दुवा मानली जाते, त्याचप्रकारे कन्याकुमारीतील टेकड्यांचे विवेकानंद यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. देशभरात प्रवास केल्यानंतर स्वामी विवेकानंद याठिकाणी आले होते, त्यांनी तीन दिवस याठिकाणी ध्यान केले होते.