महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला, तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच गांधींचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आपण ७५ वर्षांत काहीही केलं नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही” अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.
हेही वाचा – मोदींकडून धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल; प्रियंका गांधीवढेरा यांची टीका
“अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात”
“जगभरात जर मार्टीन ल्यूथर किंग आणि नेन्सन मंडेला यांना ओळखलं जाते. मात्र, गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावलं आहे.” असेही ते म्हणाले.
“…मात्र, आपण त्याचं मार्केटींग करत नाही”
“ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरासंदर्भातील निर्णय दिला, त्यानंतर देशात कुठेही हिंसाचाराची घटना घडली नाही. सर्वत्र शांतीचं वातावरण होतं. ही शांती एकतर्फी नव्हती. याचं श्रेय सर्वांनाच जातं. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तेव्हा, बाबरी मशिदीची लढाई लढणारे इक्बाल अन्सारी तिथे उपस्थित होते. हा आपला भारत आहे. मात्र, आपण त्याचं मार्केटींग करत नाही”, असंही ही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा – निकालाच्या दिवशी पंतप्रधान मोदी काय करतात? दिनचर्या सांगताना म्हणाले; “मी…”
इंडिया आघाडीवरही केली टीका
पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीकाही केली. “आधी निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील नेते मंदिरात जात होते. मात्र, आता ते मंदिरात जाताना दिसत नाही. इतकच नाही तर या निवडणुकीच्या वेळी एकही नेता इफ्तार पार्टीला गेला नाही. कारण आम्ही तशी परिस्थिती निर्माण केली होती. आमच्यामुळे त्यांच्यावर दबाव निर्माण झाला आहे. आता मतांसाठी अशाप्रकारचं राजकारण चालणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं”, असे ते म्हणाले.