युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सोमवारी फोनवरून चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. झेलेन्स्की म्हणाले की, शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा सहभाग महत्त्वाचा आहे. भारताच्या भूमिकेसाठी आम्ही उत्सुक आहोत. भारताने यशस्वीपणे जी-२० परिषद आयोजित केल्याबद्दल मी मोदींना शुभेच्छा दिल्या.
झेलेन्स्की ट्विटमध्ये म्हणाले की, ‘मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांना जी-२० परिषदेच्या यशस्वी अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या. याच मंचावर मी शांतता फॉर्म्युला जाहीर केला. हा मुद्दा पुढे नेण्यासाठी मी भारताच्या सहभागाची अपेक्षा करतो. संयुक्त राष्ट्र संघात भारताने मानवतावादी धोरणाला दिलेल्या समर्थनाबद्दलदेखील आभार मानले.” दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर आपली भूमिका मांडली. दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून संघर्ष सोडवावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
खरं तर, फेब्रुवारीमध्ये युक्रेन-रशिया संघर्ष सुरू झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्याशी अनेकदा संवाद साधला आहे. यापूर्वी मोदींनी ४ ऑक्टोबर रोजी झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. यावेळी मोदी म्हणाले होते की, कोणताही प्रश्नाचं उत्तर लष्करी युद्ध असू शकत नाही. दोन्ही देशांनी शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवावा. शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत योगदान देण्यास तयार आहे.
हेही वाचा- “युक्रेनियन महिलांवर बलात्कार करण्यासाठी रशियन सैनिकांच्या पत्नींकडूनच प्रोत्साहन”
विशेष म्हणजे, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा भारताने अद्याप निषेध केला नाही. हा प्रश्न दोन्ही देशांनी मुत्सद्दीपणाने आणि संवादाच्या मार्गाने सोडवावा, अशी भूमिका भारताने घेतली आहे. दुसरीकडे, युक्रेननं पुन्हा एकदा भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारं खुली करावी, अशी विनंती मोदींनी झेलेन्स्की यांच्याकडे केली. युक्रेनमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर युक्रेनमध्ये शिक्षण घेणारे हजारो भारतीय विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून मायदेशी परतले होते.