Narendra Modi Discuss with Egypt President News in Marathi : इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या २३ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. जगभरातील अनेक देश आणि त्या-त्या देशांचे प्रमुख नेते या युद्धावर लक्ष ठेवून आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंदेखील या युद्धाकडे लक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धाबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे नेते अब्बास महमूद, जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह द्वितीय यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांशी बातचीत केली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी (२८ ऑक्टोबर) इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या संभाषणावेळी दोन्ही नेत्यांनी इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत चिंचा व्यक्त केली.
नरेंद्र मोदी आणि अब्देल फतह यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये शांतता आणि स्थिरता कशी निर्माण करता येईल याबाबत चर्चा केली. दोन्ह नेत्यांमधील संभाषणाबाबत मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी काल इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांच्याशी बातचीत केली. पश्चिम आशियातील सुरक्षा आणि मानवतावादी स्थितीवर त्यांच्याशी चर्चा केली. दहशतवाद, हिंसा आणि नागरिकांच्या जीतितहानीबाबत चिंता व्यक्त केली. दहशतवाद आणि हिंसेबाबत आम्हा दोघांचेही विचार एकसारखे आहेत. पश्चिम आशियात शांतता आणि स्थिरता यावी यासाठी मानवतावादी मदत पुरवण्याबाबत आमचं एकमत आहे.
इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांनी दोन दिवसांपूर्वी जगभरातील देशांना आवाहन केलं होतं की त्यांनी गाझा पट्टीत सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्देल फतह यांच्याशी बातचीत केली.
हे ही वाचा >> युद्धविरामाच्या ठरावावर भारत तटस्थ; दहशतवादाच्या विरोधाची भूमिका घेत मतदानास अनुपस्थिती
मोदी आणि अल-सिसी यांच्या संभाषणानंतर इजिप्तनेही याबाबत अधिकृत निवेदन जारी केलं आहे. यात इजिप्तने म्हटलं आहे की, दोन्ही नेत्यांनी गाझा पट्टीत इस्रायली सैन्याच्या सुरू असलेल्या मोहिमांबाबत सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेते गाझातल्या परिस्थितीबाबत गंभीर असून त्यांनी त्यावर बातचीत केली. या संघर्षाचा नागरी जीवनावर होणारा भयानक परिणाम आणि त्यामुळे तिथल्या संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. गाझा पट्टीत सुरू असलेल्या इस्रायलच्या कारवाईवर दोन्ही नेत्यांनी विस्तृत चर्चा केली.