या वर्षी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांनंतर मात्र राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. कारण पुढील वर्षी उत्तर प्रदेश या राजकीयदृष्ट्या मोठ्या राज्यासोबतच गोवा, मणिपूर, उत्तराखंड या भाजपाशासित चार राज्यांमध्ये आणि पंजाब या काँग्रेस शासित राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशचं महत्त्व लक्षात घेता भाजपानं या राज्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात प्रचाराची रणधुमाळी सुरू करणार असल्याचं समजतंय. यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपासाठी प्रतिष्ठेची निवडणूक!
उत्तर प्रदेशची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यात भाजपाविरोधी पक्षांची देशभरात एकजूट करण्याचे प्रयत्न होत असताना उत्तर प्रदेशसारखं राज्य आपल्या ताब्यात असावं, यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दसऱ्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू होणार असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात ३० हून जास्त सभा घेणार आहेत. त्यामध्ये १४ सप्टेंबरला अलिगढ आणि २६ सप्टेंबरला लखनौमध्ये मोदी सभा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृह, सहकार मंत्री अमित शाह यांच्या देखील ५० हून जास्त सभा होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे एकीकडे भाजपा आपली आहे ती सत्ता राखण्यासाठी तर विरोधक हे राज्य पुन्हा भाजपाकडून काढून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
विरोधकांची उपहासात्मक टीका
दरम्यान, भाजपाच्या या रणनीतीवर उत्तर प्रदेशमधील विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. “भाजपाला आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाची भिती वाटू लागली आहे. त्यामुळेच आता भाजपाने आपल्या प्रमुख नेत्यांना उत्तर प्रदेशमध्ये प्रचारासाठी उतरवण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे प्रवक्ते डॉ. अनुराग भदौरिया यांनी दिली आहे.