दिल्लीच्या राजपथवर दोनच दिवसांपूर्वी पार पडलेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लुकची चर्चा झाली होती. यामध्ये मोदींनी उत्तराखंडमधील पारंपरिक टोपी परिधान केली होती. या टोपीवर ब्रह्मकमळाच्या चित्रांचं विणकाम होतं. त्यांच्या या लुकची चर्चा शांत होते न होते तोच पंतप्रधान नेरेंद्र मोदी दिल्लीत झालेल्या एनसीसीच्या एका कार्यक्रमात एका नव्या लुकमध्ये दिसले आहेत. त्यांच्या या लुकची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झाली आहे. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी आपणही कधीकाळी एनसीसीचे कॅडेट होतो, अशी आठवण देखील सांगितली आहे.
पगडी, काळा चष्मा आणि लाल रंगाचा तुरा!
दिल्लीच्या करिअप्पा ग्राऊंडवर आज एनसीसीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थित एनसीसी कॅडेट्सला मार्गदर्शन केलं. यावेळी मोदींनी गडद हिरव्या रंगाची पगडी डोक्यावर घातली होती. या पगडीवर लाल रंगाचा तुरा होता. एनसीसी कॅडेट्सच्या गडद हिरव्या रंगाच्या कॅपवर देखील अशाच प्रकारचा लाल रंगाचा तुरा असतो. त्यासोबतच पंतप्रधानांनी काळ्या रंगाचा चष्मा घातला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा हटके लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
कधीकाळी मीही NCC कॅडेट होतो!
यावेळी कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी आपण एनसीसी कॅडेट असतानाची आठवण देखील सांगितली. “मला गर्व आहे की मी देखील कधीकाळी तुमच्याप्रमाणेच एनसीसीचा सक्रिय कॅडेट होतो. मला एनसीसीमध्ये ज्या प्रकारचं प्रशिक्षण मिळालं आहे, ज्या काही गोष्टी माहिती झाल्या, शिकायला मिळाल्या, त्या सर्व गोष्टींचा मला आज देशाचा पंतप्रधान म्हणून माझ्या जबाबदाऱ्या पार पाडताना फायदा होत आहे, त्यातून वेगळी ताकद मला मिळते आहे”, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.