PM Modi On MY-Bharat Calendar : पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत असतात. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी देशभरातील वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत असतात. ३० मार्च रोजी देखील पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत ‘MY-Bharat’ कॅलेंडरचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी ‘माय भारत’ कॅलेंडरबाबत सांगितलं. तसेच पंतप्रधान मोदी यांनी ‘माय भारत कॅलेंडर’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांचा विविध कामांमध्ये कशा प्रकारे चांगला उपयोग करू शकतो, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं?

“जेव्हा परीक्षा येतात, तेव्हा मी परीक्षांबाबत चर्चा करत असतो. आता काही परीक्षा सुरु झालेल्या आहेत. काही ठिकाणी तर नवीन सत्र देखील सुरु झाले आहेत. तसेच काही काळानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची वेळ येत आहे. खरं तर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची ओढ लागलेली असते. या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. या सुट्ट्यांच्या काळात विद्यार्थ्यांना त्यांचा छंद जोपासता येऊ शकतो. या काळात विद्यार्थ्यांना खूप काही गोष्टी शिकता येऊ शकतात. या सुट्ट्यांमध्ये काही सेवा कार्यात देखील जोडले जाऊ शकतात”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“सुट्ट्यांमध्ये सेवा कार्यात सहभागी होण्याचीही संधी आहे. माझी विशेष विनंती आहे की जर कोणतीही संस्था असा उपक्रम आयोजित करत असेल तर तुमचा उपक्रम #MyHoliday सोबत शेअर करा. यामुळे मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही माहिती मिळेल”, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

‘MY-Bharat’ कॅलेंडर काय आहे?

माय भारत पोर्टलवर एक विशेष कॅलेंडर तयार करण्यात आलं आहे. या कॅलेंडरमध्ये वेगवेगळ्या प्रकराच्या स्वयंसेवी कामांची यादी तयार करण्यात आलेली आहे. ही स्वयंसेवी कामे वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहेत. यामध्ये पदयात्रेपासून ते जनजागृती अशा वेगवेगळ्या मोहिमेच्या कार्यक्रमांचा समावेश असल्याची माहिती सांगितली जात आहे. यासाठी इच्छुक असलेल्या युवक या कॅलेंडरच्या माध्यमातून अशा प्रकारच्या स्वयंसेवक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊ शकतात.