भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. काल (२० जून) ते अमेरिकेसाठी रवाना झाले. या भेटीत ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर तीन बैठका घेणार आहेत. यामध्ये एक खासगी बैठक आणि एका डिनरचा समावेश असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही ते जाणार आहेत. तसेच, युएस काँग्रेसच्या नेत्यांकडूनही मोदींचं स्वागत केलं जाणार आहे.
भारताचे पंतप्रधान अमेरिकेत दाखल होताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचण्याच्या काही वेळ आधी अमेरिकेतील ७५ खासदार आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी अध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहिलं आहे, जे आता समोर आलं आहे. या पत्रात त्यांनी अध्यक्षांना भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी काम करण्यास सूचवलं आहे. यासह काही गंभीर विषयांवर चर्चा करण्यास सांगितलं आहे.
अमेरिकेतील खासदारांनी अमेरिकन परराष्ट्र विभाग आणि सिव्हिल सोसायटीच्या अहवालांचा हवाला देत राष्ट्राध्यक्षांना पंतप्रधान मोदींबरोबर काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास सांगितलं आहे. यामध्ये भारतातली पॉलिटिकल स्पेस कमी होणे, तिथला मानवाधिकाराचा मुद्दा, धार्मिक असहिष्णुता वाढणे, सिव्हिल सोसायटी संघटना आणि पत्रकारांना लक्ष्य करणे, माध्यमं आणि इंटरनेटवरील वाढते निर्बंध हे मुद्दे उपस्थित करण्यास सांगितलं आहे.
या पत्रात तिथल्या लोकप्रतिनिधिंनी म्हटलं आहे की, भारतात मानवी हक्क हिरावले जाण्यावरून जी टीका होत आहे, ती सातत्याने भारत सरकारने फेटाळली आहे. यासंबंधीचे सर्व अहवाल चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचं भारत सरकारचं म्हणणं आहे.
“मित्रांशी प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने बोललं पाहिजे”
भारत आणि अमेरिका यांच्यात रणनीतिक, आर्थिक, व्यावसायिक आणि संरक्षण संबंध असल्याचे खासदारांनी त्यांच्या पत्रात नमूद केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, भारत आणि अमेरिका हे मित्र आहेत आणि मित्रांनी नेहमी आपल्या मित्रांशी प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने बोललं पाहिजे.
हे ही वाचा >> Video: “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फॅन झालोय” न्यूयॉर्कमधल्या भेटीनंतर काय म्हणाले एलॉन मस्क?
अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पत्रात लिहिलं आहे की, दोन्ही देशांमध्ये मित्रत्वाचे संबंध आहेत, म्हणूनच आम्ही तुम्हाला (अध्यक्ष) विनंती करतो की भारत आणि अमेरिका यांच्यातील हितसंबंधांच्या विषयांव्यतिरिक्त तुम्ही मोदींसमोर थेट तिथले (भारतातले) चिंतेचे विषय मांडा. हे पत्र लिहिणाऱ्या खासदार, काँग्रेसमन आणि इतर लोकप्रतिनिधींचं नेतृत्व वॅन हॉलेन आणि प्रमिला जयपाल यांनी केलं आहे