PM Narendra Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. तसेच ते ‘क्वाड’ राष्ट्रांच्या वार्षिक शिखर परिषदेतही सहभागी झाले आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेतील भारतीयांशी संवाद साधला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांचं कौतुक केलं. तसेच “मी स्वत:साठी दुसरा मार्ग निवडला होता, दुसरं काहीतरी वेगळं करायचं ठरवलं होतं. मात्र, नियतीने मला राजकारणात आणलं”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“आपण गुजरातचे मुख्यमंत्री होऊ, असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यानंतर गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा मान मिळेल याचाही अंदाज नव्हता. एक काळ असा होता की, मी स्वतःसाठी दुसरा मार्ग निवडला होता. मी कधीच मुख्यमंत्री होईल असं वाटलं नव्हतं. पण मी गुजरातचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलो. त्यानंतर लोकांनी मला पदोन्नती दिली आणि पंतप्रधान केलं”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“कोट्यवधी भारतीयांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी आपलं जीवन समर्पित केलं. पहिल्या दिवसांपासून माझं मन आणि ध्येय स्पष्ट होतं की, मी स्वराज्यासाठी माझं जीवन देऊ शकलो नाही. मात्र, मी समृद्ध भारतासाठी माझं जीवन समर्पित करीन असे ठरवले आहे”, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
हेही वाचा : “आपलं नमस्ते आता लोकलमधून ग्लोबल झालंय”, पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील भारतीयांचं केलं कौतुक
‘आपलं नमस्ते देखील ग्लोबल झालं’
“नमस्ते अमेरिका. आता आपला नमस्ते देखील ग्लोबल झाला आहे. प्रत्येक भारतीयांमुळे हे शक्य झालं. खरं तर विदेशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांना मी राष्ट्रदूत मानतो. अमेरिकेतील भारतीयांनी खूप मोठी मजल मारली आहे. भारतीयांमुळे अमेरिकेत आपल्या देशाची प्रतिमा अधिक चांगली बनली आहे. मी प्रत्येकवेळी अमेरिकेत आल्यानंतर तुम्ही सर्वजण पाठिमागचं रेकॉर्ड मोडतात. तुम्ही सर्वजण माझ्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर आहात. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना राष्ट्रदूत मानतो. तुम्ही सर्वांनी भारत अमेरिकेला आणि अमेरिका भारताला जोडून ठेवण्याचं काम केलं आहे”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
‘एआय म्हणजे अमेरिका आणि इंडिया’
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “जगाच्या बरोबर जोडण्यासाठी आपली भारतीयता ही सर्वात मोठी ताकद आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचं योगदान जगाने पाहिलं. जगासाठी ‘एआय’चा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मात्र, मी असं मानतो की, ‘एआय’ म्हणजे अमेरिका आणि इंडिया. अमेरिका भारत एक आत्मा आहे. हा एआय आत्मा भारत आणि अमेरिका संबंधांना नवीन उंची देत आहे. हेच एआय भारत आणि अमेरिकेला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी महत्वाचा ठरेल”, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.