PM Narendra Modi US Visit: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान आज पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठक झाली असून, यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि करार झाले आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली का? असे विचारण्यात आले होते. याला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत एक लोकशाही आहे आणि आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम’ आहे, आम्ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. प्रत्येक भारतीय माझा आहे असे मला वाटते. दोन देशांचे दोन सर्वोच्च नेते कधीही अशा वैयक्तिक मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत.”
अदाणी यांच्यावरील आरोप
२०२४ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या न्याय विभागाने दाखल केलेल्या खटल्यात गौतम अदाणी यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपांनुसार, सौरऊर्जेच्या करारांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी अदाणी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे २,१०० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केले आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे व्यवहार अमेरिकन बँका आणि गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवण्यात आले होते ज्यांच्याकडून अदाणी समूहाने अब्जावधी डॉलर्स उभारले आहेत.
ट्रम्प यांचे आदेश
लाचखोरीचे आरोप समोर आल्यानंतर आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी, एका कार्यकारी आदेशाद्वारे न्याय विभागाला अदाणी समूहाची चौकशी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जवळजवळ अर्धशतक जुन्या कायद्याची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशात “अॅटर्नी जनरल यांना १८० दिवसांच्या आत FCPA अंतर्गत तपास आणि अंमलबजावणी कारवाई नियंत्रित करणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा आणि धोरणांचा आढावा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे”.
बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
यावेळी, बेकायदेशीर स्थलांतराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “इतर देशांमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना तिथे राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही. भारत आणि अमेरिकेचा विचार करता, आम्ही नेहमीच असे म्हटले आहे की, जर अमेरिकेत कोणी भारतीय नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याचे अढळल्यास, भारत त्यांना परत घेण्यास तयार आहे.”