कोलकाता : रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकार विक्रमी गुंतवणूक करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत हावडा आणि न्यू जलपायगुडीला जोडणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मोदी म्हणाले की, न्यू जलपायगुडीसह विविध रेल्वेस्थानके, विमानतळांप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीने विकसित केली जात आहेत.
पूर्वनियोजनानुसार मोदी येथे उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे त्यांना तातडीने अहमदाबादला जावे लागले. मात्र, आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर मोदी गुजरातमधील राजभवनातून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमांत सहभागी झाले.
मोदी म्हणाले, की स्वातंत्र्य चळवळीत ‘वंदे मातरम्’चा जयघोष ज्या भूमीतून झाला होता, तेथून आजपासून ‘वंदे भारत ट्रेन’ सुरू करण्यात आली आहे. ३० डिसेंबर या तारखेलाही इतिहासात खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये तिरंगा फडकवून भारताच्या स्वातंत्र्याचा बिगुल फुंकला होता. एकविसाव्या शतकात भारताच्या जलद विकासासाठी रेल्वेचा वेगवान विकास, भारतीय रेल्वेमध्ये जलद सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम विक्रमी वेगात सुरू आहे. रेल्वेचे पूर्व व पश्चिम विभाग देशाच्या अर्थव्यवस्थेत क्रांती घडवतील. त्यामुळे केंद्र सरकार रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी विक्रमी गुंतवणूक करत आहे. आज भारतीय रेल्वेच्या पुनरुत्थानासाठी देशभरात एक देशव्यापी मोहीम सुरू आहे.
मोदी म्हणाले, की, गेल्या आठ वर्षांत रेल्वेने पायाभूत काम केले असून आता येत्या आठ वर्षांत रेल्वे आधुनिकतेचा नवा प्रवास सुरू करताना दिसेल. भारतासारख्या तरुण देशासाठी भारतीय रेल्वेही तरुण अवतार घेणार आहे. यात ४७५ हून अधिक ‘वंदे भारत एक्सप्रेस’ निश्चितपणे यात मोठी भूमिका बजावतील.
यावेळी कोलकाता येथे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होत्या.
‘वंदे भारत एक्सप्रेस’ हावडा आणि ईशान्येचे प्रवेशद्वार न्यू जलपायगुडीला जोडेल. ही रेल्वेगाडी ५६४ किमीचे अंतर सात तास ४५ मिनिटांत पार करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या मार्गावरील इतर गाडय़ांच्या तुलनेत प्रवासाच्या वेळेत तीन तासांची बचत होईल.
यावेळी पंतप्रधानांनी चार रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. तसेच ३३५ कोटींहून जास्त निधी खर्च करून विकसित केल्या जाणाऱ्या न्यू जलपायगुडी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.
घोषणाबाजीमुळे ममतांचा व्यासपीठावर येण्यास नकार
हावडा स्थानकावर झालेल्या शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यासपीठावर बसण्यास नकार दिल्याने संबंधितांत अस्वस्थता निर्माण झाली होती. ममता नाराज दिसत होत्या. या रेल्वे स्थानकावर भाजप समर्थकांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे बॅनर्जी त्रस्त झाल्या. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी ममता यांचे मन वळवण्याचा व त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाला आणि मुख्यमंत्री व्यासपीठासमोर उपस्थितांमधील खुर्चीत बसल्या.