उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथील सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सूचक शब्दात इशारा दिला आहे. पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याची दुसरी चूक केली तेव्हा आम्ही त्यांच्या घरात घुसलो व एअर स्ट्राइक केला. आता पाकिस्तानच्या सु्द्धा ही गोष्ट लक्षात आली आहे की, तिसरी चूक केली तर होत्याचे नव्हते होईल असे मोदी मोरादाबाद येथील सभेत म्हणाले.
PM Modi in Moradabad: When they committed the second mistake in Pulwama, we entered their home & conducted airstrike. Udhar walon ko bhi samajh mein aa gaya hai ki agar teesri galti hui to lene ke dene padd jaenge. https://t.co/u7EeclAa63
— ANI UP (@ANINewsUP) April 14, 2019
याआधी काय व्हायचे. दहशतवादी पाकिस्तानातून यायचे. आपल्यावर हल्ला करायचे आणि काँग्रेस सरकार जगासमोर आपल्यावर हल्ला झाला म्हणून रडगाणे गायचे. पण हा नवीन भारत आहे. जेव्हा दहशतवाद्यांनी उरीमध्ये हल्ला केला. तेव्हा आपल्या शूर सैनिकांनी तिथे जाऊन सर्जिकल स्ट्राइक केला असे मोदी म्हणाले.
जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधानाची भूमिका घेणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कथुआ येथील सभेत बोचरी टीका केली. जम्मू-काश्मीरच्या दोन कुटुंबांना भारताचे विभाजन करु देणार नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अब्दुल्ला आणि मुफ्ती दोघांनी जम्मू-काश्मीरच्या तीन पिढया उद्धवस्त केल्या. मी अब्दुल्ला आणि मुफ्ती यांना देशाचे विभाजन करु देणार नाही. ना मी कोणासमोर झुकत, ना कोणी मला विकत घेऊ शकतं असे मोदी सभेमध्ये म्हणाले.
अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंबाने जम्मू-काश्मीरच्या तीन पिढया उद्धवस्त केल्या. या दोघांच्या गच्छंतीनंतरच जम्मू-काश्मीरला चांगले भविष्य आहे. त्यांना वाटेल तेवढे ते मोदीला अपशब्द सुनावू शकतात. पण ते भारताचे विभाजन करु शकणार नाहीत असे मोदी म्हणाले. काँग्रेसच्या धोरणांमुळेच काश्मिरी पंडितांना खोऱ्यातील स्वत:चे राहते घर सोडून बाहेर पडावे लागले.