एक्स्प्रेस वृत्त, चंडीगड/ लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत जेव्हा पंतप्रधानांशी बोललो, तेव्हा पाच मिनिटांतच आमच्यात वाद झाला असा दावा मलिक यांनी केला आहे. ते खूप अहंकारी आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
हरयाणातील दादरी येथे एका कार्यक्रमात बोलताना मलिक यांनी घटनाक्रम कथन केला. शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर जेव्हा पंतप्रधानांना भेटलो तेव्हा पाच मिनिटांत वाद झाला. ते खूप अहंकारी आहेत असा आरोप मलिक यांनी केला. आमचे पाचशे जण दगावले असे मी त्यांना म्हणालो तेव्हा माझ्यासाठी ते गेले काय? असा सवाल त्यांनी केला. मी म्हणालो हो तुम्ही सत्तेत आहात. यानंतर वाद झाला. पंतप्रधानांनी मला गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यास सांगितले, असा दावा मलिक यांनी केला.
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गर्विष्ठ’ संबोधून वादळ निर्माण करणारे सत्यपाल मलिक यांनी आक्रमक पवित्रा एका दिवसातच बासनात गुंडाळला आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्दय़ावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींबद्दल अपशब्द उच्चारल्याचा दावाही मलिक यांनी केला होता. पण, मोदींबद्दल शहांना आदर असल्याचे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्यपाल मलिक यांनी सातत्याने केंद्र सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. केंद्राने वादग्रस्त कृषि कायदे मागे घेतले नाहीत तर, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळणार नाही, असे वादग्रस्त विधान मलिक यांनी पूर्वी केले होते.
आता त्यांच्या नव्या वादग्रस्त विधानांची चित्रफीत समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पंतप्रधानांनी गांभीर्याने पाहावे अशी विनंती करण्यासाठी मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती व मोदींच्या सांगण्यावरून मलिक यांनी शहांचीही भेट घेतली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मलिकांच्या म्हणण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शहांनी, पंतप्रधानांचे डोके फिरले असल्याचे म्हटले होते, असा दावा मलिकांनी चित्रफितीत केला आहे.
ही चित्रफीत रविवारी ‘व्हायरल’ झाली. त्याची दखल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतली. त्यांनी ही चित्रफीत ट्वीट केल्यानंतर सोमवारी राजकीय वाद निर्माण झाला.
मलिक यांनी नमते घेतले असून शहांच्या कथित विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान माझे ऐकायला तयार नव्हते. मी मांडलेल्या शंका त्यांनी धुडकावून लावल्या आणि अमित शहांना भेटण्याची सूचना त्यांनी मला केली. शहा नेहमीच मोदींचा आदर करतात. लोकांनी पंतप्रधानांची दिशाभूल केली आहे. एक दिवस पंतप्रधानांना ते समजेल, असे शहांनी मला सांगितले. शहांनी मोदींविषयी अनुद्गार काढले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मी मांडलेल्या शंकांचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन शहांनी मला दिले, असे स्पष्टीकरण सत्यपाल मलिक यांनी सोमवारी दिले.
भाजपचे मौन, काँग्रेस आक्रमक
मलिक यांच्या वादग्रस्त विधानाकडे भाजपने यावेळीही दुर्लक्ष केले. यापूर्वीही मलिकांनी केलेल्या विधानांवर भाजपच्या नेत्यांनी मौन बाळगणे पसंत केले होते. मलिक हे आधी जम्मू-काश्मीर, गोवा आणि आता मेघालयचे राज्यपाल असल्याने संविधानपदावरील व्यक्तीवर टीका करण्याचे भाजपने टाळले आहे. काँग्रेसने मात्र मोदींवर टीका केली आहे. मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी केली. मोदींचे विधान त्याची शेतकरी विरोधी मानसिकता उघड करते. शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या ७०० हून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली जावी, एका सदस्याला नोकरी द्यावी तसेच हमीभावासंदर्भातील समितीची २४ तासांत स्थापना करून ३० दिवसांमध्ये समितीने अहवाल सादर करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
‘मृत्यू टळले असते..’
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मलिक यांनी मोदींशी भेट झाली तेव्हा पहिल्या पाच मिनिटांमध्ये मोदींशी भांडण झाल्याचा दावा मलिक यांनी चित्रफितीत केला आहे. शेतकरी आंदोलनात पाचशेहून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे मी त्यांना सांगितले. पण, त्यावर मोदींनी, शेतकऱ्यांनी माझ्यासाठी मृत्यू पत्करला का?, असा उद्दाम प्रश्न केल्याचा दावाही मलिक यांनी केला. मोदींशी झालेल्या संभाषणावर मलिक यांनी स्पष्टीकरण दिले नाही वा मोदींसंदर्भात केलेले विधानही त्यांनी मागे घेतलेले नाही. मात्र, कृषि कायदे रद्द करण्याचा निर्णय योग्य असून तो पूर्वीच घ्यायला हवा होता. तसे झाले असते तर मोदींवर राजकीय टीका झाली नसती व शेतकऱ्यांचे मृत्यूही टळले असते, असे मत मलिक यांनी व्यक्त केले आहे.