मणिपूर पेटलेलं असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे का जात नाहीत? असा सवाल करणाऱ्या विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यानंतर मंगळवारपासून या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु झाली. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर मतदान होणार आहे. अशात राहुल गांधी यांनी बुधवारी जे भाषण लोकसभेत केलं त्यात त्यांनी भाजपाचा उल्लेख देशद्रोही असा केला. तसंच मणिपूरमध्ये तुम्ही भारतमातेची हत्या केली असंही वक्तव्य केलं. या सगळ्या आरोपांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत.
मोदींविरोधात विरोधी पक्षाने कोणते तीन प्रश्न उपस्थित केले आहेत?
१) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपर्यंत मणिपूरला का गेले नाहीत?
२) पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूरवर भाष्य करायला ८० दिवस का लागले?
३) मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा अद्याप का घेतला गेला नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देणार हे महत्त्वाचं
या तीन प्रश्नांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बुधवारी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली त्यावेळी मणिपूरचा उल्लेख केला होता. तसंच भाजपाने भारतमातेची मणिपूरमध्ये हत्या केली आहे असंही म्हटलं होतं. त्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोलू शकतात. आत्तापर्यंत विरोधी पक्षातर्फे गौरव गोगोई, राहुल गांधी, ललन सिंह, सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. तर सत्ताधारी पक्षापैकी निशिकांत दुबे, किरण रिजेजू, स्मृती इराणी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही या प्रश्नी बाजू मांडली आहे. आज विरोधी पक्षातर्फे अधीर रंजन चौधरी आणि शशी थरुर बोलणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर उत्तर देतील.
अमित शाह यांनी मणिपूरच्या प्रश्नावर रोखठोक भाषण करत विरोधकांचे सगळे मुद्दे खोडून काढले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आज लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी गदारोळ घातला. त्यानंतर १२ वाजेपर्यंत संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. दुसरीकडे राहुल गांधी यांनी जे भाषण केलं, त्या भाषणाला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्येचा मुद्दाही उपस्थित करत काँग्रेसला सवाल केले. तसंच राहुल गांधी यांच्या फ्लाइंग किसच्या मुद्द्यावरही गदारोळ सुरु आहे. त्यावरुनही विविध आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावर पंतप्रधान काही बोलणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या मुद्द्यांचा समावेश आजच्या पंतप्रधानांच्या भाषणात असू शकतो.