पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (२० जून) अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. २०१४ ला पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी अनेकदा अमेरिकेचा दौरा केला आहे. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता जाऊन जो बायडेन अध्यक्ष झाले तरीही भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध सलोख्याचेच राहिले आहेत. दरम्यान, आजपासून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. हा त्यांचा एक महत्त्वाचा दौरा असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा २० ते २४ जून असा एकूण पाच दिवसांचा असेल. या दौऱ्यात ते अमेरिकेच्या संसदेत भाषण करणार आहेत. अमेरिकेच्या संसदेत दोनदा भाषण करण्याची संधी मिळालेले मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत.

अमेरिकेच्या संसदेत भाषणाव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे अनेक सेलिब्रेटींना भेटणार आहेत. मोदी यावेळी एकूण २४ व्यक्तिंना भेटणार आहेत. यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्वान, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतर सेलिब्रेटींचा समावेश आहे.

नरेंद्र मोदी अमेरिकेत ज्या २४ दिग्गजांना भेटणार आहेत त्यामध्ये टेस्ला आणि स्पेसएक्सचे सहसंस्थापक एलॉन मस्क, खगोलभौतिकशास्त्रज्ञ नील डीग्रेस टायसन, ग्रॅमी पुरस्कार विजेती इंडो-अमेरीकन गायिका फालू (फाल्गुनी शाह), पॉल रोमर, निकोलस नसीम तालेब, रे दालियो, जेफ स्मिथ, मायकेल फ्रोमन डॅनियल रसेल, एल्ब्रिज कोल्बाय, डॉ. पीटर अॅग्रे, डॉ स्टीफन क्लास्को आणि चंद्रिका टंडन.

हे ही वाचा >> ओडिशातील रेल्वे अपघातप्रकरणाला नवं वळण, सिग्नल इंजीनियर कुटुंबासह बेपत्ता, सीबीआयचं मोठं पाऊल

या दौऱ्याचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत असणार आहेत. पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र संघटनेला विनंती केल्यानंतर २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi will meet 24 celebrities during us visit elo musk falu shah asc
Show comments