लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यावेळी एनडीएमधील काही नेत्यांनीही मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा असून ते इटलीला जाणार आहेत. इटलीमध्ये जी ७ शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले असून या शिखर परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इटलीमध्ये १४ ते १५ जून या कालावधीत जी ७ शिखर परिषद पार पडणार आहे. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आदी महत्वाचे नेते या शिखर परिषदेला उपस्थित असणार आहेत. या शिखर परिषदेमध्ये जागतिक पातळीवरील काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

हेही वाचा : “माझ्यात मोदींप्रमाणे दैवीशक्ती…”, राहुल गांधींची टीका; वायनाड की रायबरेली? यावरही दिले उत्तर

दरम्यान, परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटलीच्या दौऱ्याविषयी बोलताना सांगितलं की, ‘इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १४ जून रोजी होणाऱ्या ५० व्या जी ७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी १३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीसाठी रवाना होणार आहेत. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिला परदेश दौरा असेल’, असं त्यांनी सांगितलं.

शिखर परिषदेत कोणत्या विषयांवर चर्चा होणार?

इटलीत होणाऱ्या जी ७ शिखर परिषदेत अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा, जपान, ब्रिटन या देशाच्या प्रमुख नेत्यांचा सहभाग असणार आहे. यावेळी जी ७ शिखर परिषदेत रशिया आणि युक्रेन युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याबरोबरच आदी जागतिक विषयांवरील मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर या दौऱ्यावेळी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही असण्याची शक्यता आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांच्यासह आदींचा सहभाग असल्याची शक्यता आहे. या इटलीच्या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक देशाच्या प्रमुखांबरोबर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi will visit italy for the g7 summit marathi news gkt