Pandharpur Ashadhi Wari 2023 : अवघा महाराष्ट्र आज विठ्ठलाच्या भक्तीतन न्हाऊन निघाला आहे. पंढरपूरसह राज्यातील विविध ठिकाणी विठ्ठल मंदिरात भाविकांनी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देण्यासाठी ट्वीट केलं आहे. “सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल!” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट केलं आहे.
आज बकरी ईदही आहे. यानिमित्तानेही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. “ईद-उल-अधाच्या शुभेच्छा. हा दिवस सर्वांना सुख-समृद्धी घेऊन येवो. तसेच आपल्या समाजात एकोप्याचा आणि सलोख्याचा भाव टिकून राहो. ईद मुबारक!” असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक विठूराया चरणी लीन
गेल्या महिन्याभरापासून पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेला वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरात दाखल झाला आणि अवघी पंढरी विठ्ठल-रखुमाईच्या नावाने दुमदुमून गेली. आपल्या विठ्ठलाच्या भेटीनं वारकऱ्यांचं मन तृप्त झालं, पायी निघालेल्या वारकऱ्यांचे कष्ट लाडक्या विठुरायाच्या दर्शनानं कुठल्याकुठे पळून गेले. लाखोंच्या संख्येनं भाविक पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणी लीन झाले. या भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या पंढरपूरच्या मंदिरात पहाटे तीनच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली.
राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच राज्यातील जनता सुखी समाधानी आणि आनंदी रहावी हीच मागणी विठुरायाच्या चरणी मागितल्याचे त्यांनी सांगितले.