पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तू आणि अविस्मरणीय वस्तूंचे दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एनजीएमए) येथे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व भेटवस्तूंचा लिलाव होणार आहे. त्यासाठी इंटरनेटवर ऑनलाइन बोली लावण्यात येणार आहे.
लिलाव होणाऱ्या या वस्तूंमध्ये भारताच्या विविध सांस्कृतींचे दर्शन घडवणाऱ्या भेटवस्तूंचा समावेश आहे. यामध्ये मोदींना मिळालेल्या विविध पगड्या, पोषाख, जॅकेट्स तसेच ऐतिहासिक आणि कलाकुसरीच्या वस्तू, विविध पेटिंग्ज, एका परदेश दौऱ्यानिमित्त मोदींना मिळालेला खंजीर ज्याची किंमत २० हजार रुपये आहे, या वस्तूंचाही समावेश आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान कार्यालयाचा कारभार स्विकारल्यानंतर मोदींना विविध दौऱ्यांदरम्यान अशा स्वरुपाच्या भेटवस्तू मिळालेल्या आहेत.
त्याचबरोबर मोदींना लोकप्रिय व्यक्तींच्या प्रतिमाही भेट म्हणून प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी विवेकानंद, नारायण गुरु यांच्या प्रतिमांचा समावेश आहे. एनजीएमएनेच्या एका प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, या सर्व भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव होणार आहे. मात्र, याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. या लिलावातून जमा झालेला पैसा दान म्हणून देण्यात येणार आहे.
लिलावासाठी ठेवण्यात येणाऱ्या या प्रत्येक भेटवस्तूंची आधारभूत किंमत ५०० रुपये असणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही किंमत निश्चित करण्यात आली आहे. अशा सुमारे २००० वस्तूंचा लिलाव होणार आहे. नॅशल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टमध्ये भरवण्यात आलेल्या या वस्तूंचे प्रदर्शन ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध देशांच्या दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांचे केवळ जोरदार स्वागतच केले जात नाही तर त्यांना विविध वस्तू भेट स्वरुपात दिल्या जातात. दोन महिन्यांपूर्वीच परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की, जुलै २०१७ पासून जून २०१८पर्यंत मोदींना परदेश दौऱ्यांदरम्यान १६८ भेटवस्तू मिळाल्या आहेत.