पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी देशातील वाढत्या महागाईविरोधात आंदोलन केलं आहे. ते ‘ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन’चे उपाध्यक्ष आहेत. संघटनेच्या विविध मागण्यांसाठी ते मंगळवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनात बसले. यावेळी संघटनेचे इतरही सदस्य आंदोलनासाठी उपस्थित होते. त्यांनी हातात बॅनर घेऊन घोषणाबाजी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी देशातील वाढत्या महागाईवर प्रतिक्रिया देताना प्रल्हाद मोदी म्हणाले की, “ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करणार आहे. ज्यामध्ये आमच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांची यादी देण्यात येणार आहे. वाढत्या महागाईमुळे दुकाने चालवण्यासाठी जादा खर्च करावा लागत आहे. अशा स्थितीत आमच्या मार्जिनमध्ये केवळ २० पैसे प्रति किलो वाढ करणं, ही क्रूर चेष्टा आहे. आम्‍ही केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी आम्‍हाला दिलासा द्यावा आणि आमची आर्थिक दुर्दशा संपवावी.”

“ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल” असंही प्रल्हाद मोदी यांनी यावेळी सांगितलं. तर ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंभर बसू यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, ते बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेण्याची तयारी करत आहेत.

हेही वाचा- “डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधलेल्यांना महागाई कशी दिसेल?”; महागाईवरून राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्र

केंद्र सरकारने तांदूळ, गहू आणि साखरेची नुकसानभरपाई द्यावी. खाद्यतेल आणि डाळींचं वाटप रास्त भाव दुकानांमधून करावं. तसेच मोफत अन्नधान्य वितरणासाठी ‘पश्चिम बंगाल रेशन मॉडेल’ देशभरात लागू करावं, अशा मागण्या या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modis brother prahlad modi protest againt inflation and price hike in delhi rmm