तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने स्वतःला रोबोट बनण्यापासून रोखले पाहिजे. कलेच्या साधनेशिवाय व्यक्ती रोबोट बनतो आणि संवेदना गमावून बसतो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रत्येक विद्यार्थ्याने एखाद्या कलेची आयुष्यभर साधना केली पाहिजे, असा गुरुमंत्र देशभरातील विद्यार्थ्यांना दिला. शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले, शिक्षक दिन हा शिक्षकांच्या तपस्येचे स्मरण करण्याचा दिवस आहे. डॉक्टरांनी एखादी मोठी शस्त्रक्रिया केली तर त्याला मोठी प्रसिद्धी मिळते. मात्र, असे हजारो डॉक्टर, इंजिनिअर घडवणाऱया डॉक्टरांचे स्मरण केले जात नाही. देशाला आज जे काही चांगले डॉक्टर आणि शिक्षक मिळाले, त्यामागे शिक्षकाचे योगदान आहे. त्यांच्या तपस्येमुळेच हे शक्य झाले आहे. विद्यार्थी हीच शिक्षकांची ओळख असतात. ते आपल्या पराक्रमाने गुरुजनांचे नाव मोठे करतात. आई मुलाला जन्म देते, पण त्याला जीवन देण्याचे काम शिक्षक करत असतात.
शिक्षक कधीही निवृत्त होत नसतात, असे सांगून मोदी यांनी शिक्षकांनी आठवणीतल्या विद्यार्थ्यांबद्दल लिहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. लहान मुलांकडून जे काही शिकायला मिळते, ते इतर कुठेच शिकायला मिळत नाही. सभोवताली घडणाऱया घटनांचा लहान मुले आरसा असतात, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader