अवघ्या महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमध्ये प्रचार करत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये मोदी प्रचारसभेहून परतत असताना एका रुग्णवाहिकेसाठी त्यांनी आपला ताफा थांबवल्याचं दिसत होतं. तशाच प्रकारची घटना आता गुजरातमध्ये घडली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. गुजरातच्या अहमदाबाद भागातील हा व्हिडीओ असून यामध्ये मोदींच्या ताफ्याच्या मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी त्यांनी वाट करून दिल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसनं त्याच्याच काही वेळ आधीचा एक व्हिडीओ शेअर करत हा दावा फेटाळून लावला आहे.
नेमकं काय घडलं?
एएनआय या वृत्तसंस्थेनं हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा रोड शो काल गुजरातमध्ये पार पडला. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा रोड शो महत्त्वाचा मानला जातो. गुजरातमधल्या नरोडागाम पासून गांधीनगर दक्षिण मतदारसंघापर्यंत हा रोड शो काढण्यात आला. यावेळी मोदींचा ताफा अहमदाबादमध्ये आल्यानंतर त्याचवेळी ताफ्याच्या मागून एक रुग्णवाहिका जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. काही अंतर गेल्यानंतर पुढे मोठा रस्ता येताच मोदींच्या ताफ्याने रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी जागा करून दिल्याचंही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
महिन्याभरापूर्वीच घडला होता असाच प्रसंग!
दरम्यान, अवघ्या महिन्याभरापूर्वीच असाच एक प्रसंग घडला होता. हिमाचल प्रदेशच्या चांबी परिसरात प्रचारसभा घेतल्यानंतर परतत असताना मोदींच्या ताफ्यासमोर एक रुग्णवाहिका आली. त्यावेळी मोदींनी ताफा काही वेळ थांबवून रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करून दिला. ही रुग्णवाहिका निघून गेल्यानंतर मोदींचा ताफा मार्गस्थ झाला.
Video: …आणि रुग्णवाहिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवला ताफा; व्हिडीओ व्हायरल!
दरम्यान, एकीकडे मोदींचा गुजरातमधला नवा व्हिडीओ व्हायरल झाला असताना दुसरीकडे काँग्रेसनं त्याच्याच काही वेळ आधी या रुग्णवाहिकेला ताफ्यामुळे बराच वेळ अडकून पडावं लागल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे राष्ट्रीय समन्वयक नितीन अगरवाल यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला असून त्यामध्ये एक रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं दिसून येत आहे. एकीकडे ही रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकली असताना दुसरीकडे पलीकडून गाड्यांचा मोठा ताफा जाताना दिसत आहे.
हा व्हिडीओ नेमका मोदींच्या गुजरातमधील रोड शोच्या वेळचाच हा व्हिडीओ आहे किंवा नाही, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.