पाकिस्तानातील गव्हाचे उत्पादन यावर्षी सुमारे ३० लाख टनांनी कमी होण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत गव्हाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत गव्हाचे पीठ महाग होऊ देणार नाही. यासाठी मला माझे कपडे विकावे लागले तरी चालेल, असे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. खैबर पख्तुनख्वाच्या शांगला जिल्ह्यातील बिशाम तहसीलमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल-एन) च्या जाहीर सभेला संबोधित करताना शरीफ यांनी प्रांतातील गव्हाच्या किमती कमी करण्याचे आश्वासन दिले.

शरीफ यांनी म्हटले की राज्यातील पिठाच्या किमती कशा खाली आणायच्या हे त्यांना चांगले ठाऊक आहे. त्यांनी राज्य सरकारला स्वखर्चाने पिठाच्या किमती कमी करण्याचे निर्देश दिले. अहवालानुसार, देशाच्या पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी सांगितले की गव्हाचे उत्पादन २८.८९ दशलक्ष टनांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत २६.१७३ दशलक्ष टन होईल. तर अंदाजे खप सुमारे ३०.७९ दशलक्ष टन असेल.

इम्रान खान यांनी नागरिकांसाठी काम केले नाही

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकारवर पंतप्रधान शरीफ यांनी टीका केली. नागरिकांना मुलभूत हक्क मिळवून देण्याच्या योजनेवर काम करण्याऐवजी देशद्रोही आणि निष्ठावंतांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, असे ते म्हणाले. पीटीआय सरकारने इतिहासात सर्वाधिक कर्जे मिळविली होती, परंतु विकास आणि लोककल्याणाच्या प्रकल्पांमध्ये कोणतीही गुंतवणूक केली नाही. तेल आणि वायू खरेदीबाबत वेळीच निर्णय न घेतल्याने राष्ट्रीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे ते म्हणाले.