पंजाब पोलिसांना आंदोलकांबाबत आधीच गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली होती, पण असे असतानाही त्यांनी ‘ब्लू बुक’चे नियम पाळले नाहीत तसेच तसेच दुसऱ्या मार्गाची तयारीही केली नाही, असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण तापल्यानंतर गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या ब्लू बुकमध्ये म्हणजेच एसपीजीमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला. या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार केला आहे.
मोदींच्या सुरक्षेत त्रुटी? पंजाब सरकारचं भाजपाला प्रत्युत्तर; मुख्यमंत्री चन्नी म्हणाले…!
“ब्लू बुकनुसार, पंजाबमध्ये पाहिल्याप्रमाणे, कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास राज्य पोलिसांना आकस्मिक मार्ग आधीच तयार करावा लागतो. इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी पंजाब पोलिसांच्या सतत संपर्कात होते आणि त्यांना आंदोलकांची माहिती दिली आणि पंजाब पोलिसांनी त्यांना पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले होते,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
“एसपीजी जवान पंतप्रधानांच्या भोवती वर्तुळात राहतात, पण इतर सर्व कारवाईची जबाबदारी राज्य सरकारची आहे. अचानक बदल झाल्यास, राज्य पोलिसांकडून एसपीजी अद्ययावत माहिती दिली जाते. त्यानुसार व्हीआयपींच्या कार्यक्रमांमध्ये बदल केला जातो,” असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सुरक्षेमधील चूक नाही तर रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा न घेताच परतले मोदी; Video शेअर करत नेत्याची टीका
२०२१ मध्ये पंजाबमध्ये पाकिस्तानमधून आलेले सुमारे १५० ड्रोन दिसले होते. यातील अनेक ड्रोनमध्ये टिफिन बॉम्ब, ग्रेनेड, पिस्तूल आणि रोख रक्कम होती. आता गृह मंत्रालयाच्या पथकाने पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान पंजाब पोलिसांनी केलेल्या सुरक्षा उपायांची माहिती मागवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमधील फिरोजपूरमध्ये अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार होते. या प्रकल्पांची किंमत सुमारे ४२ हजार ७५० कोटी रुपये होती. गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते. मात्र, पावसामुळे पंतप्रधान मोदींनी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा पंतप्रधानांचा ताफा स्मारकापासून ३० किमी अंतरावर असलेल्या उड्डाणपुलावर पोहोचला, तेव्हा काही आंदोलकांनी तिथे रस्ता अडवल्याचे दिसून आले. पंतप्रधान मोदी सुमारे २० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकले होते. दरम्यान, मोदींच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली जात आहे.