कोळसा खाणवाटप घोटाळ्यात सीबीआयने माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्यावर कारस्थान रचल्याचा आणि भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आता थेट पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला. कोळसा खाण वाटपात मनमोहन सिंग यांनीच अंतिम निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची मागणी पारख यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची भारतीय जनता पक्षाच्या मागणीचेही त्यांनी समर्थन केले.
ओडिशामध्ये आठ वर्षांपूर्वी दोन कोळसा खाणींच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत सीबीआयने मंगळवारी उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि पारख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या विषयावर प्रतिक्रिया देताना पारख यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱयांनी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, भुवनेश्वरसह सहा ठिकाणी छापे टाकले. या शहरातील हिंदाल्को कंपनीच्या कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले. पारख यांच्या सिकंदराबाद आणि हैदराबादमधील निवासस्थानांवरही छापे टाकण्यात आले. आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट करीत पारख म्हणाले, सरकारने त्यावेळी घेतलेल्या निर्णयात कोणतीही चूक होती, असे मला वाटत नाही. तो निर्णय़ अतिशय योग्यच होता. आता यामध्ये सीबीआयला कोणते कारस्थान दिसते, ते मला माहिती नाही. जर कारस्थान असेलच, तर त्यामध्ये इतरही काहीजण सहभागी आहेत. कुमार मंगलम बिर्ला हे एक, मी दुसरा आणि या सर्वावर अंतिम निर्णय घेणारे मनमोहन सिंग हे कारस्थान रचणारे तिसरे सदस्य आहेत.