देशाची अर्थव्यवस्था पेचात सापडण्यास यूपीए सरकारचा धोरणलकवा आणि कल्पनांची दिवाळखोरीच कारणीभूत असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने बुधवारी डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया सावरता येत नसेल, तर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे, अशी मागणी केली.
विख्यात अर्थतज्ज्ञ असल्यामुळे मनमोहन सिंग हे सुरुवातीला अर्थमंत्री झाले आणि त्यानंतर पंतप्रधान पदावर आरुढ झाले. जर त्यांना घसरणारा रुपया सावरता येत नसेल आणि देशाची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवता येत नसेल, तर त्यांना पदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांनी पदावरून पायउतार झालेच पाहिजे, असे भाजपचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन म्हणाले.
यूपीए सरकारची शासनशून्यता, निर्णयांची चालढकल आणि कल्पनांच्या दिवाळखोरीमुळेच सध्या देशावर ही परिस्थिती ओढवल्याचे पक्षाचे आणखी एक प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले. मनमोहनसिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळानेच या सर्वाची जबाबदारी घेतली पाहिजे. देशाच्या आयात-निर्यात धोरणाबाबत यूपीए सरकारने योग्यवेळी निर्णय घेतले असते आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गुंतवणूक केली असती, तर अर्थव्यवस्थेचे चित्र अधिक चांगले असले असते, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारने केलेल्या चुकांची शिक्षा आता देशातील लोकांना भोगायला लागणार आहे, असा आरोप करीत देशाची आर्थिक परिस्थिती आता सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचेही जावडेकर म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा