नवी दिल्ली : भारतीय युवकांचे सामर्थ्य देशाला विकसित होण्याच्या दिशेने घेऊन जाईल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ कार्यक्रमाला संबोधित करताना व्यक्त केला.
भारत विकसित होण्याचे उद्दिष्ट काही लोकांना अवघड वाटेल, परंतु ते अशक्य नसल्याचे ते म्हणाले. ‘विकसित भारत’च्या भावनेने उचललेले प्रत्येक पाऊल, धोरण आणि निर्णय याबाबत योग्य मार्गदर्शन झाले तर भारताला विकसित देश होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
विकसित भारत म्हणजे जो आर्थिक, धोरणात्मक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत असेल, जिथे अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाचीही भरभराट होईल, असे ते म्हणाले. २०४७ पर्यंतची २५ वर्षे भारताचा सुवर्णकाळ (अमृतकाळ) असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा >>> छत्तीसगडमध्ये दोन महिलांसह पाच नक्षलवादी ठार
कोणत्याही देशाने प्रगती साधण्यासाठी महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ध्येय नसलेले जीवन अकल्पनीय आहे. जेव्हा आपण महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवतो, तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी आपण अथक परिश्रम करतो. आज भारत या भावनेला मूर्त स्वरूप देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
३००० युवकांशी संवाद
कार्यक्रमात ३० लाखांहून अधिक सहभागींमधून गुणवत्तेवर आधारित, बहुस्तरीय निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या ३००० युवकांशी पंतप्रधानांनी संवाद साधला स्वामी विवेकानंद यांचा १२ जानेवारी हा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. तत्पूर्वी पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली.
‘विकसित भारत’ एकट्या मोदींच्या मालकीचा नाही, तर त्यांचाही आहे. महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान