पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सोमवारी मुझफ्फरनगरच्या दंगलग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. गेल्या आठवडय़ात येथे झालेल्या धार्मिक दंगलीत ४७ जणांचा बळी गेला होता.
या भेटीदरम्यान पंतप्रधान दंगलग्रस्त भागांची पाहणी करणार असून तेथील स्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. या भेटीत ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. अखिलेश यांनी यापूर्वीच पंतप्रधानांशी संपर्क साधला असून येथील स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी त्यांना दिले आहे.
पंतप्रधानांनी या दंगलीतील मृतांविषयी दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. या दंगलीच्या पाश्र्वभूमीवर येत्या २३ तारखेला राष्ट्रीय एकात्मता आयोगाची नवी दिल्लीत बैठक होणार आहे.

Story img Loader