राष्ट्रीय निवडणूक झाल्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चर्चा चालू होती. मात्र आता या दोन्ही पक्षांचे युतीवर एकमत झाले असून सत्तेत कोणाचा किती सहभाग असेल, कोणाला किती पदे मिळणार तसेच पंतप्रधानदी कोणाची निवड होणार? या सर्वांचा त्यांनी प्रभावी तोडगा काढला आहे. पीएमएल-एन आणि पीपीपी या दोन्ही पक्षांत युती झाली असून लवकरच ते पाकिस्तानमध्ये सरकारची स्थापना करणार आहेत.
शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान
पीपीपी आणि पीएमएल-एन या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत पाकिस्तानमध्ये मंगळवारी रात्री एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमच्यात युती झाली असून लवकरच आम्ही सत्तास्थापनेचा दावा करू, अशी घोषणा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली. पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होतील तर पीपीपीचे सह-अध्यक्ष असिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून निवड केली जाईल. शाहबाज यांच्या मंत्रिमंडळात कोणाला कोणती मंत्रिपदं दिली जातील, याचा तपशील नंतर जाहीर केला जाईल असे झरदारी यांनी यावेळी सांगितले.
कोणाचा किती जागांवर विजय?
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय निवडणूक झाली होती. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे निवडणूक लढवण्यावर बंदी असलेल्या पीटीआय पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांचा गट या निवडणुकीत सर्वांत मोठा गट म्हणून समोर आला होता. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्रानुसार एकूण ९३ जागांवर अपक्ष उमेदवारांचा तर पीएमएल-एन पक्षाचा ७५ आणि पीपीपीचा ५४ जागांवर विजय झाला.