‘फ्लॅटस्क्रिन टिव्ही’, रंगरंगोटीसह पंतप्रधान कार्यालय नव्या पंतप्रधानांसाठी सज्ज

दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाला नवे स्वरुप देण्यात आले आहे. निवृत्ती जाहीर केलेले विद्यमान पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग या आठवड्यात आपले पंतप्रधानपदाचे अधिकार सोडणार आहेत. त्यांचा कार्यकाल संपण्यास काही तास उरले आहेत. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयात नव्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पंतप्रधान कार्यालयही सज्ज झाले आहे. शुक्रवारी जाहीर होणाऱया निकालांवर पंतप्रधानपदावर कोण विराजमान होणार हे स्पष्ट होईल.
नवे पंतप्रधान येण्याआधी पंतप्रधान कार्यालयातही जय्यत तयारी सुरू आहे. कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयात याआधी रंगीत टेलिव्हिजन नव्हता आता नवा ‘फ्लॅट स्क्रिन टेलिव्हिजन’ पंतप्रधानांच्या कार्यालयात बसविण्यात आला आहे. गेली दहा वर्षे पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणाऱया मनमोहन सिंग यांना रंगीत टीव्हीची कधी गरजच भासली नाही किंवा त्यांनी तशी विचारणाही केली नव्हती. परंतु, यावेळी पंतप्रधान कार्यालयाने नव्या फ्लॅट टेलिव्हिजन्स बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संपूर्ण कार्यालयाच्या रंगरंगोटीहीचे काम जोरदार सुरू आहे. कार्यालयातील सर्व लाकडी बाके ‘पॉलीश’करून चकचकीत करण्यात येत आहेत. कार्यालयाचा ‘रिच लुक’ अबाधित ठेवण्यासाठी त्याच्या स्वरुपात कोणताही मोठा बदल करण्यात येणार नसल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे.

गुरूवारी होणारी कॅबिनेट बैठक या सरकारची अखेरची बैठक असण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निरोप समारंभाचा लहानसा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
“कार्यालयातील मूळ फर्निचर आणि इतर गोष्टी बदलण्यात येणार नसून लहान-सहान आवश्यक वाटणाऱया गोष्टी नव्याने बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला. फर्निचर आणि इतर महत्वाच्या गोष्टी बदलण्याचा निर्णय निश्चितच नव्या पंतप्रधानांच्या हाती असेल. परंतु, त्याआधी काही आवश्यक गोष्टी बदलण्याची गरज होती त्या बदलण्यात आलेल्या आहेत.” असे कार्यालयाच्या अधिकाऱयाने सांगितले.

Story img Loader