पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावर असून त्यावरून सध्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राजस्थान हे काँग्रेसशासित राज्य असून लवकरच राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. राजस्थानमध्ये मोदींच्या हस्ते विकासकामांची उद्घाटनं केली जाणार असून त्यातील एका कार्यक्रमात आपलं भाषण हटवल्याचं ट्वीट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलं होतं. त्यावर थेट पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तरही आलं. त्यामुळे आता या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
नेमकं काय घडलं?
या सगळ्या वादाची सुरुवात अशोक गेहलोत यांच्या ट्वीटवरून झाली. या ट्वीटमध्ये अशोक गेहलोत यांनी आपलं भाषण कार्यक्रमातून हटवल्याचा थेट आरोप केला आहे. “पंतप्रधान मोदीजी, आपण आज राजस्थानमध्ये येत आहात. आपल्या कार्यालयाने माझं पूर्वनियोजित ३ मिनिटांचं भाषण कार्यक्रमातून हटवलं आहे. त्यामुळे मी भाषणातून तुमचं स्वागत करू शकत नाहीये. त्यामुळे मी ट्वीटमधूनच आपलं राजस्थानमध्ये मनापासून स्वागत करतोय”, असं अशोक गेहलोत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये अशोक गेहलोत यांनी पंतप्रधानांकडे पाच मागण्याही केल्या आहेत.
अशोक गेहलोत यांच्या या ट्वीटवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. खुद्द मुख्यमंत्र्यांचंच भाषण कार्यक्रमातून हटवण्यात आल्यामुळे काँग्रेसकडून यावर आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर राहू शकत नसल्यामुळे व्हिडीओच्या माध्यमातून आपला संदेश देता यावा, अशी मागणी गेहलोत यांनी केली असून ती प्रोटोकॉलमध्ये बसणारी नाही, अशी भूमिका पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आल्याचंही बोललं जात आहे. यासंदर्भात गेहलोत यांच्या ट्वीटनंतर थेट पंतप्रधान कार्यालयानं ट्वीट करून उत्तर दिलं आहे.
PMO चं ट्वीटच्या माध्यमातून उत्तर
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयानं आपल्या ट्वीटमध्ये गेहलोत यांचा दावा खोडून काढला आहे. “अशोक गेहलोतजी, प्रोटोकॉलनुसार तुम्हाला आमंत्रणही देण्यात आलं होतं आणि तुमच्या भाषणासाठी वेळही राखीव ठेवण्यात आला होता. पण तुमच्या कार्यालयाने तुम्ही येऊ शकणार नसल्याचं कळवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याआधीच्या दौऱ्यांमध्येही आपणाला नेहमी आमंत्रित करण्यात आलं असून आपणही त्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. आजच्या कार्यक्रमातही आपलं स्वागतच आहे. विकासकामांच्या उद्घाटनासंदर्भातल्या फलकांवरही आपलं नाव आहे. नुकत्याच झालेल्या दुखापतीमुळे आपणाला जर काही अस्वस्थता नसल्यास कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती मोलाची आहे”, असं ट्वीट पंतप्रधान कार्यालयानं केलं आहे.
अशोक गेहलोत यांचं प्रत्युत्तर, कार्यक्रम पत्रिकाच केली शेअर!
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीटनंतर अशोक गेहलोत यांनी पुन्हा एक ट्वीट केलं आहे. यामध्ये पंतप्रधान कार्यालयाचा दावा खोडून काढला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपल्या कार्यालयानं माझ्या ट्वीटची दखल घेतली. मात्र, कदाचित त्यांनाही वास्तवाची माहिती देण्यात आलेली नसावी. भारत सरकारच्या आरोग्य विभागाने पाठवलेल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझ्या भाषणाचा उल्लेख होता. पण काल रात्री मला पुन्हा सांगण्यात आलं की माझं भाषण होणार नाही”, असं गेहलोत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“माझ्या कार्यालयानं भारत सरकारला सांगितलं होतं की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्या पायाला दुखापत लागल्यामुळे मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होईन. माझे मंत्री कार्यक्रमस्थळी उपस्थित असतील. अजूनही मी राजस्थानच्या हितासाठी कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नॉन इंटरॅक्टिव्ह मोडवर सहभागी असेन”, असंही अशोक गेहलोत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
या ट्वीटसोबत गेहलोत यांनी कार्यक्रम पत्रिकेचे फोटोही शेअर केले आहेत.